Monday, February 27, 2006

मन माझे ..

मन माझे अवखळ, जसा झरा खळखळ,
नाही साचणे कुठेही, मस्त धावणे फेसाळ.

मन माझे मन माझे, चमकता काचखडा,
कधी फुटतो तुटतो, जातो अंगभर तडा.

मन माझे रानवारा, जसा वाहतो बेभान,
कधी झुळूक हवीशी, कधी भीषण तूफान.


मंद समईसारखे, मन माझे तेवणारे,
कधी होते रे विखारी, ते निखारे जळणारे.

स्वतःभोवती हे फिरे, मन माझे रे भोवरा,
धुंद आपल्या गतीत, गिरक्या घे गरगरा.

मन माझे आर्द्र घन, जसा नभी दाटलेला,
शतधारांनी करितो, ओलीचिंब या मातीला.

मन गवताची पाती, वाऱ्यावर डुलणारी,
कधी होते धारदार, तलवार ते दुधारी.

मन माझे काळी माती, मन सुपीक धरणी,
मळे फुलती स्वप्नांचे, वेड्या मनाची करणी.

मन रहाटगाडगे, जसे विहिरीवरचे,
कधी भरे काठोकाठ, रिक्त पुन्हा घट याचे.

इंद्रधनुष्य जसे की, ह्याचे अगणित रंग,
आणि जगाहून साऱ्या, याचा वेगळाच ढंग.

शांत सागरासारखे, मन माझे हे अथांग,
सुखदुःख भाव सारे, वरवरचे तरंग.


-- मंदार.

एका लग्नाची गोष्ट

सुप्रभाती रोज जाई कर्ण गंगेच्या जळी,
अर्घ्य देई सूर्यदेवा रिक्त करि तो ओंजळी.

दान अर्घ्यांचे तयाचे आणि सूर्याराधना,
व्रतीसमान चालती कधीच त्यास खंड ना.

परन्तु एका प्रभाती क्रम तयाचा मोडिला,
"वाचवा! बुडते जळी !" आक्रोश त्याने ऐकिला.

गंगेवरी पाणी भराया ललना कुणी आली असे,
पडून तोल जाउनी मग दूर वाहत जातसे.

कानी पडे ती साद अन् क्षणही न कर्ण दवडि तो,
युवतीला वाचवुनी काठांवर आणि तो.

खोल पाण्याच्या भयाने हरपली शुद्धी जिची,
हळूच घाटावर नदीच्या ठेवि तो काया तिची.

युवती, अति सुन्दरशी, कर्ण पाहत राहिला,
क्षणकाल ते अर्घ्यदान, साधना तो विसरला.

आणुनी निमिषात अपुले उत्तरीय कोरडे,
पुसण्या मुख हळुच तिचे, कर्ण तेथे धडपडे.

जाग स्पर्शाने तयाच्या, सुन्दरीला येतसे,
पाहुन राजस रूप त्याचे लाजुन ती हासतसे.

एक क्षण कर्णास वाटे सर्व सृष्टी थांबली,
होता दृष्टादृष्ट त्यांची, गंगाही मनि हासली !

पळभरातच कन्यका ती येतसे भानावरी,
मंदसे स्मित मग करून निघुन जाई सत्वरी.

"अरे! उत्तरीय माझे, घेऊन गेली सुन्दरी!
काय म्हणतिल, परत जाता, लोक हस्तिनापुरी?"

'वृषाली' असे ती कुमारी सूतकन्या लाघवी,
कर्णपत्नी होतसे मग, अंगराज्ञिपद भूषवी.

कर्णाचे पण 'तोपर्यंत' लक्ष नाही लागले,
मुख वृषालीचेच त्या, रविबिंब भासू लागले !

-- मंदार.

( शिवाजीराव सावंतांच्या "मृत्युंजय" मधल्या परिच्छेदावर आधारित )

प्रेमाची चारोळी ;)

जीव जिच्यावर जडला माझा, ती मुळी मज पाहि ना,
ज्यावर ती अनुरक्त हो, तिज तो विरक्त जवळी घेइ ना,
प्राण ओवाळुनी टाकि कुणि अन्य मजवरि कन्यका,
ती, तो, मी, ही, मदनाचाहि धिक्कारच करि मी रसिका ..

-- मंदार.

(एका संस्कृत सुभाषिताचा अनुवाद)

स्मरण कुसुमाग्रजांचे

आज कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिन. १९४२ च्या लढ्यात "गर्जा जयजयकार क्रांतीचा" लिहिणारे कुसुमाग्रज. नटसम्राट सारखं नाटक ज्यांच्या लेखणीतून उतरलं, ते कुसुमाग्रज. एका बाजूला दिसतात कोलंबसाचे गर्वगीत, पृथ्वीचे गर्वगीत, मातीची दर्पोक्ती अशा कविता तर दुसरीकडे कालिदासाच्या मेघदूतातल्या रचनांवर आधारित कविता. त्यांनी लिहिलेलं वाचण्याचा आनंद नाही सांगता यायचा शब्दात. इथे त्यांच्या कवितांचा संग्रह तुम्ही पाहू शकाल.

"चला उभारा उंच शिडे ती गर्वाने वरती,
कथा या खुळ्या सागराला,
अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा,
किनारा तुला पामराला ! "

Sunday, February 26, 2006

ऊन ..

सकाळचं सुरेख कोवळं ऊन पडलंय. माझ्या बाल्कनीमधून हळूच आलंय आत. या कोवळ्या उन्हानं मला पहिल्यापासूनच वेड लावलं आहे. पुण्यातल्या आमच्या जुन्या वाड्यातल्या घरी आंघोळ करून झाल्यावर कोवळ्या उन्हात उभं राहायचो ते आठवतंय अजून. इतकी वर्षं मनात घर करून बसलेलं हे ऊन, माझ्या पामराच्या शब्दात -