Thursday, October 31, 2024

परापूजा

आदि शंकराचार्यांनी केलेल्या ’परापूजा’ ह्या अतीव सुंदर संस्कृत रचनेचा समश्लोकी मराठी भावानुवाद (सुमंदारमाला वृत्तामध्ये).

++++++

मूळ रचना: 


अखण्डे सच्चिदानन्दे निर्विकल्पैकरुपिणि ।
स्थितेऽद्वितीयभावेऽस्मिन्कथं पूजा विधीयते ।।

पूर्णस्यावाहनं कुत्र सर्वाधारस्य चासनम् ।
स्वच्छस्य पाद्यमर्घ्यं च शुद्धस्याचमनं कुत: ।।

निर्मलस्य कुत: स्नानं वस्त्रं विश्वोदरस्य च ।
अगोत्रस्य त्ववर्णस्य कुतस्तस्योपवीतकम् ।।

निर्लेपस्य कुतो गन्ध: पुष्पं निर्वासनस्य च ।
निर्विशेषस्य का भूषा कोऽलन्कारो निराकृते: ।।

निरञ्जनस्य किं धूपैर्दीपैर्वा सर्वसाक्षिण: ।
निजानन्दैकतृप्तस्य नैवेद्यं किं भवेदिह ।।

विश्वानन्दपितुस्तस्य किं ताम्बूलं प्रकल्प्यते ।
स्वयंप्रकाशचिद्रूपो योऽसावर्कादिभासक: ।।

प्रदक्षिणा ह्यनन्तस्य ह्यद्वयस्य कुतो नति: ।
वेदवाक्यैरवेदयस्य कुत: स्तोत्रं विधीयते ।।

स्वयंप्रकाशमानस्य कुतो नीराजनं विभो: ।
अंतर्बहिश्च पूर्णस्य कथमुद्वासनं भवेत् ।।

एवमेव परापूजा सर्वावस्थासु सर्वदा ।
एकबुद्धया तु देवेशे विधेया ब्रह्मवित्तमै: ।।

- आदि शंकराचार्य. 

++++++

असे ठायि ठायी सदा सर्वभूती उरे व्यापुनी सर्व भूमंडळा
कशी होय पूजा जिथे राहतो ना तयापासुनी कोणिही वेगळा

मुळाधार संपूर्ण आहे तयाला कसे बोलवा अन् कुठे बैसवा
तया निर्मळाला कसे अर्घ्य देणे, विशुद्धास अन् आचमन पाजवा

कुठे स्नान स्वच्छास अन् वस्त्र त्याला, उभे विश्व ज्यानेच आच्छादिले
जया वर्ण नाही, जया गोत्र कोठे? तया जानवे घालण्याला दिले!

जया राग-लोभादि लवलेश नाही, फुले गंध त्याला कसे वाहतो
हिरे माणकांची नि आरास कैसी अरूपी निराकार जो राहतो

प्रभा सर्व जगतास ज्याची उजळते, तयाला दिवे लाख होती फिके
जया अंतरातील आनंद वाहे, तया गोड नैवेद्य सारे फुके

रमे विश्व आनंदरंगी जयाच्या, तयालाच तांबूल देणे कसे
उरी चंद्र-सूर्यांस तो जन्म देतो, उजेडातल्या जो उजेडी असे

जगा लीलया पूर्ण व्यापून उरला, तयाभोवती भक्त कैसा फिरे
कसे वेद, स्तोत्रांत वर्णा तयाला, स्वभावेच जो वेदमंत्री झरे

जिथे फाकलेला स्वत:च्या प्रकाशी, तया काय नीरांजने लावणे
निरोपास त्याला कुठे घेउनी जा? जिथे आत, बाहेर त्याचे जिणे

अशी ही परापूजनी बुद्धि आता, रमावी स्वये पूर्णज्ञानी निळ्या
परागी वसे त्याच तत्त्वात रंगू, न कमळाहुनी वेगळ्या पाकळ्या

- मंदार. 

Saturday, October 26, 2024

संध्याकाळच्या ओव्या


शुक्रास लाजून
पश्चिमा आरक्त
केवळ ही निमित्त
संध्याकाळ

अजून पूर्वेला
सूर्याचा आठव
मनात साठव
संध्याकाळ

केसांत गारवा
मनाचा पारवा
लाटांत मारवा
संध्याकाळ

सूर्याच्या तेजाळ
दानास जागते
चांदणे पेरते
संध्याकाळ

पाखरांची पुन्हा
थांबली कुजबूज
आठवांचे गूज
संध्याकाळ

आता हात सुटे
खोल काही तुटे
शेवटची भेटे
संध्याकाळ


- मंदार.

Wednesday, October 23, 2024

कृष्णार्पण


अपमान शांततेने साहतो कृष्ण आहे
अपराध शेकड्यांनी मोजतो कृष्ण आहे

मार्गात बांध घाला, टाका कितीक धोंडे
त्यातून पारदर्शी वाहतो कृष्ण आहे

टीका, प्रलोभने वा, शंका, खुशामतीही
गोंगाट ऐकुनी हा हासतो कृष्ण आहे

ईर्ष्या, अहं, असूया, मद, मोह, मत्सरादी
वैर्‍यांस आज सार्‍या मारतो कृष्ण आहे

हरवेल वाट आता, संपेल सर्व वाटे
हाकेस तोच माझ्या धावतो कृष्ण आहे

अपुल्याच माणसांनी विश्वासघात केला
हाती धनुष्य घ्याया सांगतो कृष्ण आहे

घनगर्द संकटांचे आभाळ दाटलेले
त्यांना कडा रुप्याच्या लावतो कृष्ण आहे

मुरलीत स्तब्धतेला, किरणांत वादळाला,
गीतेत संभ्रमाला बांधतो कृष्ण आहे

-- मंदार.

Monday, October 07, 2024

आहे पण, अन् नाही पण..!

जरा तुझ्याशी भांडायाचे आहे पण अन् नाही पण
जरा स्वत:शी जुळवायाचे आहे पण अन् नाही पण

कुणी ऐकतो मख्खपणे अन् कुणी चघळतो अफवाही  
मनातले सल सांगायाचे आहे पण अन् नाही पण

किती ऐकले पोक्त इशारे, टोले, सल्ले प्रेमाचे
फक्त स्वत:चे ऐकायाचे आहे पण अन् नाही पण

करायचे ते केले नाही दिवसा स्वप्ने बहुरंगी
मारुन-मुटकुन सजवायाचे आहे पण अन् नाही पण

जादूच्या ह्या मंचापुढती तर्काचे हे सोंग फुके
जरा-जरासे लपवायाचे आहे पण अन् नाही पण

भाळावरच्या रेषांबद्दल धन्यवाद अन् गार्‍हाणे
आपण अपुले रेखायाचे आहे पण अन् नाही पण

 - मंदार.

Sunday, August 11, 2024

संक्रमण


मी छाटल्या ठिकाणी उमलून आज आलो
ग्रीष्मातला बहावा होऊन आज आलो

चांभारचौकश्यांना चकवून आज आलो
कुप्रश्न धाडसाचे उठवून आज आलो

वेड्यांमुखी प्रशंसा वदवून आज आलो
हेटाळणीस त्यांच्या टाळून आज आलो

जे लागले जिव्हारी लपवून आज आलो
मौनात संयमाला सजवून आज आलो

चिंता - नव्हे - चितांना फसवून आज आलो
माया अशाश्वताची सोडून आज आलो

- मंदार.

Tuesday, March 07, 2023

तुला भावणारा ..

"कवितेचं पान" या मधुराणीताईने चालवलेल्या नितांत सुंदर चॅनेलवर एक आशयघन कविता ऐकायला मिळाली. रश्मी मर्डी या कवयित्रीने सुरेख लिहिलीये, आणि गायलीयेही फार अप्रतिम. नक्की ऐका - 

"तुला भावणारी" - रश्मी मर्डी (https://youtu.be/DVe2EKZS1nA?t=94)


तुला भावणारी अशी रोज नवखी कशी होत गेले मला ना कळे
किती यत्न केले तुला जिंकण्याचे तरी ना कसे रे तुला आकळे
तुझ्या जाणिवांना जपावे किती सांग मी रोज आतून कोमेजते
आता शांत मी ही हळू होत आहे जशी ज्योत हळुवार मंदावते

शिरस्त्याप्रमाणे जरी रोज येतो नि जातो तुझ्या आठवांचा थवा
अश्या कोवळ्या जीर्ण पाशात आता नको वाटते गुंतवावे जिवा
नव्याने सुखाचे जुने भास होता पुन्हा पापणी रोज पाणावते
आता शांत मी ही हळू होत आहे जशी ज्योत हळुवार मंदावते

खुज्या भाग्यरेषा अश्या आपुल्या रे कि स्वप्नातही सोबतीला न तू 
शिशीराप्रमाणे बहरलो असे का हरवले कुठे वेगळाले ऋतू
असे काय घडले कुठे शोध घेऊ मनाला नवे रोज समजावते 
आता शांत मी ही हळू होत आहे जशी ज्योत हळुवार मंदावते



ही आज अनंत वेळा ऐकली! आणि ऐकताना वाटलं की ’त्या’ची ही एक बाजू असेल ती लिहावी. त्यातून जे आलं ते ---  

तुला भावणारा जरी आज आहे तुला शोभणारा न अद्याप मी 
तुला हिरकणीला नसे कोंदणासारखा शिंपला मोतियाचा न मी
नव्याने स्वत:ला जगी घडवतो मी तुझ्या आठवांना उरी वाहतो
जरी शांत राहे तुझी आस आहे तुझे स्वप्न घेऊन मी चालतो 

खळाळे तुझे शुभ्र माधुर्य सरिते सखा सागरासारखा नाही मी
तुझ्या चांदण्याला न शरदास मेघांविना साजरे शांत आकाश मी 
तुझ्या मोकळया वारूला वेगवारा मनासारखा सोबती वाहतो  
जरी शांत राहे तुझी आस आहे तुझे स्वप्न घेऊन मी चालतो 

बटांच्या न पक्ष्यांस आधार आता जुन्या ओळखीचा नसे वृक्ष मी
तुला शांतवाया मला साधणारा नसे राउळी धीर गंधार मी
तुझे मूक अश्रू पहाटे दंवासारखे मी मुक्याने इथे झेलतो 
जरी शांत राहे तुझी आस आहे तुझे स्वप्न घेऊन मी चालतो 


- मंदार. 

Tuesday, November 02, 2021

रंग माझा वेगळा - सुरेश भट

रंगुनी रंगात सा-या रंग माझा वेगळा, 

गुंतुनी गुंत्यात सा-या पाय माझा मोकळा


सुरेश भटांचं आयुष्य वादळी होतं. मला वाटतं हे गीत त्यांनी बरंचसं स्वत:च्या अनुभवांवर लिहिलं आहे. 

आयुष्यातले उतार-चढाव बहुतेकांच्या नशिबी असतातच. पण सामान्यांच्या मानाने भटांच्या वाट्याला आलेले अनुभव अतिशय खडतर होते. पायाला पोलियो, शालेय जीवनातलं अपयश, त्यामुळे घरात आणि बाहेर दुय्यम वागणूक आणि उपेक्षा, आणि कालांतराने स्वत:ला काही अंशी सिद्ध करून देखील वाट्याला आलेली परकेपणाची भावना. 

ह्या सगळ्यातून भटांसारखा कलंदर माणूस उत्कटतेनं जगत राहतो. अडचणी-दु:ख हे सहन करत असतानाही ते एक आपला वेगळा ठसा उमटवतात, आपला असा एक विलक्षण परीघ निर्माण करतात, आणि तो उत्तरोत्तर वाढवत नेतात. हे गीत म्हणजे या प्रवासाची कहाणी आहे. 

रंगुनी रंगात सा-या रंग माझा वेगळा, 

गुंतुनी गुंत्यात सा-या पाय माझा मोकळा

वाट्याला आलेली सुखं-दु:खं भोगताना आपला एक वेगळा रंग-ढंग आकार घेत जातो. प्राक्तन कोणाला चुकत नाही, पण भटांसारखे कलंदर ह्या जगरहाटीत गुंतूनही निराळीच उंची गाठतात.


भोग जे येती कपाळी ते सुखाने भोगतो;

अन्‌ कळ्या झाल्या कधीच्या सोशिल्या ज्याच्या कळा !

ह्या सोसलेल्या कळांच्या कळ्या-फुलं करण्याचा कलंदरपणा भटांसारख्यांकडेच असतो. भोवताली कितीही विदारक परिस्थिती असेल तरी आपल्या आतल्या प्रेरणेने काही लोक त्या चिखलातही कमळं फुलवतात. (ह्याची पराकोटीची साक्ष देतात ज्ञानेश्वरांनी आपल्या पाठीवर भाजलेले मांडे, किंवा Victor Frankl सारख्यांचे नाझी छळछावणीतले अनुभव.)  आणि ह्यातून जात असताना फार थोड्या लोकांना भटांची खरी ओळख पटली आहे. एके ठिकाणी त्यांनी लिहिलंय, "जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला, मी इथे हे अमृताचे रोपटे रूजवून गेलो..!"


राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी

हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा !

दु:ख सुद्धा पूर्ण झोकून देऊन भोगता येतं. त्या वेळच्या अश्रूंची झालेली गाणी भटांची साथ करत राहतात. नेहेमी त्यांच्या ओठांवर येत राहतात. इथे पुन्हा पुन्हा वाट्याला येणारी काही एक प्रकारची दु:खं भट सांगतायत - जी त्यांच्या आसपास घोटाळत राहतात - जणू त्यांना भटांचा लळा लागलाय!  भटांचाच एक शेर आहे -  "प्राण जाताना दग्याचा मी कुठे आरोप केला ? ओळखीच्या माणसांचे ओळखीचे घाव होते.."  हे असे ओळखीचेच घाव पचवत भट पुढे जात राहतात.


कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो

अन्‌ कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ?

अन्याय, अवहेलना, उपेक्षा सहन करत करत भट स्वत:ला सावरू बघतात. पण हे करत असताना बाकीच्यांच्या वाटेला येणारं साधं आयुष्य, त्यातल्या लहान पण सोनेरी क्षणांना ते पारखे राहून जातात. 


सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा :

"चालणारा पांगळा अन्‌ पाहणारा आंधळा !"

ह्या प्रवासाच्या एका टप्प्यावर स्वत:ला नुसतं सावरूनच नाही, तर फुलवून भट प्रस्थापित होतात. एक उदाहरण म्हणजे बीएला दोनदा नापास झालेल्या सुरेश भटांचा ‘रंग माझा वेगळा’ हा काव्यसंग्रह एम.ए.साठी अभ्यासक्रमात क्रमिक पुस्तक म्हणून ठेवला जातो. पण हे होत असतानाही, स्वत:चे काही कर्तृत्व नसणा-यांनी (खोट्या मार्गदर्शकांनी) त्यांची उपेक्षाच केली. भटांच्या आयुष्याला एखाद-दोन विशेषणांत बंदिस्त करून त्यांच्या कामगिरीला छेद देण्याचा, कमी लेखण्याचा प्रयत्न झाला.. 


माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :

माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !


इथे शेवटच्या शेरात भट प्रखरपणाने प्रकट होतात. हा सगळा प्रवास हा फक्त सुरेश भट ह्या व्यक्तीच्या संघर्षाचा नसून, त्यांच्या कलंदर जगण्याने प्रेरित होणा-या अनेकांचा आहे. जेव्हा सगळीकडे अनीती पसरली आहे, दिलदारपणा संपला आहे, एकमेकांनी फक्त खाली ओढण्याचा खेळ चालला आहे, अश्या माणसांनी स्वत:च निर्माण केलेल्या मध्यरात्री, भटांसारखा एक कलंदर सूर्यासारखा हिंडतो आहे. आपल्या परिघातला अंधार निपटून टाकतो आहे. आपल्यासारखे उत्कट जगणारे कोणी शोधतो आहे. अश्या पेटून जगणा-यांबद्दल भटांनी लिहिलंय - "जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा, विजा घेऊन येणा-या पिढ्यांशी बोलतो आम्ही!"


भटसाहेबांसारखा गीतकार-गज़लकार पुन्हा होणं नाही.. त्यांच्या प्रतिभेला आणि जीवनदृष्टीला नकळत हात जोडले जातात!