दीस गढूळला आता त्यात हरवलं रान
काळ्या चुन्यात रंगून काजळलं पान पान
हरवलाय तो पार, ती तापलेली दुपार अन् पानाच्या डब्यांतली कात-चुन्याची कुजबूज. सुरकुतलेल्या सुपा-या परतल्यात आपापल्या चंचीत. आता वाट बघायची दोन आगींची - एक भाकरी देऊन पोट भरणार, दुसरी गप्पा रंगवून मनभर होणार. तिसरी? - ती ओघळून गेलीये शेजेवरून कधीच.
दीस सावळा कुंभार आला घरास दमून
पांढुरकी बाराबंदी दिली हळू उतरून
हातावरची माती झालीये आता कोरडीठण्ण. तळहात दिसतोय उन्हाळ्यातल्या भेगाळ जमिनीसारखा. अंग अन् अंगावरचं कापड दोन्ही सैल झालेत वा-यानं. बघ उडलं, उडलं.. उडून गेलं!
दीस तंबू एकखांबी एक त्याचा मक्तेदार
आता हजार चांदण्या घुमटाला तोलणार
सोन्याचा भलामोठा हंडा फुटून मोहरा झाल्यात अंगणभर. कोणी वेडा बसेल आता त्या वेचीत. तशीही आठवणींच्या पारंब्यांना लटकत भुतासारखी रात्र काढायची खोड आहेच त्याला.
दीस बाहेर उन्हात एक थकला जीवक
मनडोहात काळोख्या आता शोधतो दीपक
भगभगीत प्रकाशात जे दिसलं नाही, ते अंधार दाखवू शकेल? हो, कदाचित; जिथं हरवलंय तिथं शोधलं तर. नाहीतर दिवास्वप्न आहेच, उद्या संध्याकाळचं.
मंदार.
Wednesday, December 22, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
खूप आवडली ही कविता!! :) संध्येचं वर्णन युक्त केलंस! आता उषेला शब्दात पकडायला (वाचायला) आतुर आहे :)
loved the theme of last two poems. like milind said, i am also waiting for the next version!
आता वाट बघायची दोन आगींची - एक भाकरी देऊन पोट भरणार, दुसरी गप्पा रंगवून मनभर होणार. तिसरी? - ती ओघळून गेलीये शेजेवरून कधीच.
unbeatable this is!
Post a Comment