Sunday, December 01, 2013

कुणी बुद्धी घेता का बुद्धी?

कुणी बुद्धी घेता का बुद्धी?

घ्या ना थोडीतरी, ताई!

मूठभर तुम्हाला देऊ, दादा?

अति झालेल्या अकलेला

गि-हाईक शोधतोय मी.
खूप महागात पडतीये मला..
पडता भाव घेऊन खपवतोय झालं.

आमचे येथे बुद्धी विकणे आहे!

बक्कळ अक्कल, मार्मिक मती,
कवीची कल्पना, अल्पशी प्रज्ञा,
झालंच तर -
तिखट तर्क, वैज्ञानिक जाण,
माणुसकीचं तत्त्वज्ञान,
सगळा माल अहंकार-भेसळमुक्त मिळेल.
(असं नुस्तं लिहायचं असतं, हेही शिकलोय नुकताच!)

अक्कल बाजूला ठेवल्याशिवाय

साधं रोजचं जगता येत नाहीये!

शाळेच्या वर्गात रोज घोकतो ती प्रतिज्ञा

बाहेर आल्यावर सहज विसरता येत नाहीये,
मूल्यशिक्षणाच्या तासाला कानावर पडलेलं
शाळेबाहेरच्या कचराकुंडीत फेकता येत नाहीये,
कॉलेजमधला लोकप्रिय खेळ -
"आधी शिक्षक (चांगलं शिकवणार), 
का आधी विद्यार्थी (नियमित हजेरी लावणार)"
उगाचच माझं डोकं फिरवतोय!

देवळाच्या पायरीवर बसलेल्या भिका-यांकडे दुर्लक्ष करता येत नाहीये,

(जर "देतो, तो देव" असेल, तर ते आत जाऊन
काही मागण्या ऐवजी तुम्हा-आम्हा माणसांना का मागताहेत?)
आडनाव विचारल्याशिवाय देवाची सेवाही करू देत नाहीत, हे
"आपलं तर दर्शन झालं ना घेऊन" असं म्हणून सोडून देता येत नाहीये,
सोन्यानं मढलेल्या सुरेख मूर्ती पाहून
रोज अर्धपोटी झोपणा-या करोडोंना विसरता येत नाहीये,
घरातला कचरा काढून उंब-याबाहेर फेकता येत नाहीये,
आज आपल्याला देवालयांपेक्षा शौचालयांची गरज आहे
हे कोणी म्हणलं तर त्याची टर उडवता येत नाहीये..

जी बुद्धी वापरून विज्ञान शिकलो, इंजिनीयर झालो,

ती बुद्धी फक्त इंजिनियरिंगच्या कामात
आणि पैसे कमवायलाच वापरायची;
पण ते पैसे कसे, कशासाठी वापरायचे
हे ठरवताना मात्र गहाण टाकायची - जमत नाहीये!

रोजच्या बातम्या ऐकवत नाहीयेत,

त्याच त्याच नेत्यांना निवडून देता येत नाहीये,
"अहो, भ्रष्टाचार असायचाच, आपलं ठीक चाललंय ना?"
असं चहाकटिंग मारता मारता म्हणता येत नाहीये,
इतकं काय, "हर फ़िक्र को धुएं में उड़ाना" पण जमत नाहीये!

खरं तर हे इतकं सरळ आहे -

माझं डोकं हे बुद्धी वापरण्यासाठी नाहीच,
नंदीबैलासारखं सगळ्या रूढी-परंपरा-पद्धतींना
"हो, हो" म्हणण्यासाठी आहे!
(आणि हो - पैसे कमवण्यासाठी. त्याचं सोंग नाही आणता येत!)

त्या बुद्धीने कठीण, गहन प्रश्न विचारायचेच नाहीत,

लोक सांगत आले ते ऐकत जायचं, तसंच करत जायचं,
आपल्याला पटो, न पटो... - हे जमतच नाहीये!
.. तुम्ही घेऊन टाकलीत तर नक्की जमेल!

कुणी बुद्धी घेता का बुद्धी?


- मंदार.

4 comments:

Sumedh said...

असामान्य बुद्धिजीवी वर्गाची व्यथा ह्या कवितेत अतिशय सुरेख मांडलेली आहे. ह्या वर्गाची आजची परिस्थिती अत्यंत दारुण आहे हे लगोलग स्पष्ट होते. प्रत्यक्ष समाजात धीषणा वापरण्याऐवजी कविता लिहिणे श्रेयस्कर मानण्यापर्यन्त ह्या वर्गाचे अध:पतन होणे ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे, हे प्रस्तुत कविता सुन्दर रित्या दर्शविते.

Gayatri said...

नाही घेत ज्जा, तुझी बुद्धी.
सुखासारखीच असते ती, वाटून टाकल्यावर वाढणारी.
किंवा खरंतर असाध्य संसर्गजन्य रोगासारखी.
एवढं काही ’हे’ समजू नको आम्हांला.
गुंतवणुकीच्या नावाखाली लुबाडणूक करवून घ्यायची नस्ती हौस नाहीये इथे कुणाला.
बुद्धीच्या चकचकीत वेष्टनात गुंडाळलेले तुझे ते गहन, कठीण प्रश्न म्हणजे सौंदर्यप्रसाधनांच्या गुळगुळीत बाटल्यांच्या आत भरलेलं कर्करोगाचं आवतणच की.

त्यापेक्षा तू असं कर: ती जी जास्तीची अक्कल आहे ना, तिला "आपलं कुटुंब हे आपल्या समाजापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे" या भावनेची जोड दे. कुटुंब हे समाजाचाच एक भाग आहे, हे शुद्ध मूर्खपणाचं गृहीतक अजिबात ध्यानात घेऊ नकोस. मग बघ : सगळे गहन प्रश्न बाजूला ठेवायला, चार अनुभवी लोक सांगत आलेत तसंच वागायला, आपली सोय आधी बघायला (विमानात सुद्धा सांगतात: आधी स्वत:ला ऑक्सिजन मास्क लावा, मग इतरांना मदत करा!) तुझी ती बुद्धी फार मनापासून मदत करेल तुला.



Unknown said...

mandar chi gadyarupi kavita(?)chhan ch ahe. kadhi na kadhi pratyekala he watun gela asnar ch ahe, watat hi asnare ani pudhe hi watat raheel. dar weles kana-DoLa karun gaaDi pudhe neli ki zala. hyach arthachi Gayatri chi re-kavita killer ahe! kamaal ahe kharach tyatla sarcastic ani sadistic tone...

Shubham Jangam said...

खूप सुंदर सर