मागण्यात काही चूक नाही, मागण्यात पाप नाही.
पाप आहे ते लाचारीत, खोटेपणात, आणि कृतघ्नतेत.
"ऊं! हे कशाला?" असं विचारण्याच्या ओघात माझ्यासारख्या नास्तिकानं विचारलं होतं - "कशाला जायचं जोगवा मागायला?"
"ठीक आहे. जोगव्याचं समर्थन नाही करणार मी. आणि तसंही कसलेसे धार्मिक संकेत आणि रूढी-परंपरा ठेवूया बाजूला. पण असंही बघ. आपण मागण्याबाबत बोलू."
"बरं."
"अरे, मानानं जगणारी, टुकीनं संसार करणारी माणसं आपण. पण वेळ आली तर नि:संकोच, प्रसंगानुरूप, लाचार न होता पण परिस्थितीची जाणीव ठेवून आपल्याला समाजाकडून काही मागता आलं पाहिजे. आपल्याच धुंदीत नेहेमीच असणारे, दारावर आलेल्या भिक्षुकाला कधीच रिकाम्या हाती जाऊ न देण्याची प्रौढी मनात का होईना मिरवणारे आपण, कधीतरी कोणाच्या दारात उभं राहून काही मागून तर पाहूया.
स्वत:साठी नको मागूस फार तर. विनोबांनी नाही भूदान मागितलं? विनोबांचं सोड. आपण नाही रे तितके मोठे. पण अहंता बाजूला ठेवून काहीतरी मागणं जमेल आपल्याला? जितक्या सहज, (आणि स्वत:ला शाबासकी देत) आपण दुस-यांच्या डोक्यावर ऋणाची बोचकी ठेवत-ठेवत जातो, तितक्याच साधेपणानं दुस-यांचं काही ऋण आपल्याही माथ्यावर घेणं जमेल? देवीच्या नावाने माग किंवा देशाच्या नावाने, दोन मुठी धान्य माग किंवा हजारो बिघे जमीन. मागून तर पहा. स्वत:पलीकडे जाण्याची, एकतर्फी ऋणाच्या कल्पनेतून मुक्त होण्याची संधी आहे ती.
मागण्याला जर कमीपणाचं समजत असशील तरी प्रसंगानुरूप वाकण्यात, एक पाऊल मागे जाण्यात कमीपणा नाही. शहाणपणा आहे. अन्यथा कोणासमोरही न वाकणा-या सम्राटालाही नतमस्तक व्हायला एखाद्या भिक्षुकाचे पाय हवेत. आणि तशी संस्कृती असणं हे बहुतांशी शहाणपणाचं आहे. सगळ्यांना नाही रे पुरत अंत:स्थ जाणीव नम्रता टिकवायला. मातीचे का होईना, बाहेरचे पाय हवे असतात डोकं टेकवायला. आत बघण्याची वाट ही अशीही जाऊ शकते.
ताठ मानेनं जगण्याची कल्पना धरून असताना, आपल्याला वाकताही यायला हवं. जसं देता यायला हवं तसं मागताही यायला हवं. त्या मागण्यात लाचारी नसावी; देणा-याला घातलेली सच्ची हाक असावी.
डोळे उघड आणि निसर्गाकडे पाहा. अनेक कडेकपारी, गुहागरुड, द-याखोरी, झाडंपाडं, नदीनाले अंगावर खेळवणारा पर्वत बघ. आणि नेमाने त्याच्या माथ्यावर बरसणारं आकाश. माझ्या दृष्टीनं दोघंही मोठे. पण बघ तो महाकाय पर्वत किती शांतपणानं, सचैल भिजून घेतोय पावसात. आकाशीचं देणं स्वीकारण्यातलं देखणंपण ह्याच्याकडून शिकावं! डोळे मिटून दाट अरण्यात ध्यानस्थ बसलेला ऋषीच जणू. वीजवारं-पाऊसपाण्याची संततधार आधी आपल्या माथ्यावर घेऊन आपल्या लेकरांना हलकेच न्हाऊमाखू घालणारा बाप.
त्या डोंगरासारखंच, आकाशातलं ऋण झेलता यायला हवं.. इतकं की आपलं घेणं देखणं होऊन जावं. "
- मंदार.
1 comment:
best!
Post a Comment