Friday, August 27, 2021

कातरवेळ

परवा म्हणालास सरतंय वय, तसा संथ होतो आहेस

.. समुद्राकडे निघालेल्या नदीसारखा संथ हो

परवा म्हणालास सरतंय वय, तसा आवाज कापतो आहे

.. कातरवेळी समईपुढला भावभरला कंठ हो


परवा म्हणालास सरतंय वय, डोळ्यांत चट्कन पाणी येतं

.. तापलेल्या जमिनीसाठी गर्द निळा मेघ हो

परवा म्हणालास सरतंय वय, तसं लक्षात राहात नाही 

.. संध्याकाळी आभाळावर बगळ्यांची रेघ हो


परवा म्हणालास सरतंय वय, दिसत नाही नीटसं काही

.. धुक्यामध्ये हरवलेली टेकडीवरची वाट हो

परवा म्हणालास सरतंय वय, उगाच गळा दाटून येतो

.. पाऊलखुणा कुरवाळणारी वाळूवरची  लाट हो


परवा म्हणालास सरतंय वय, तसा इवला होतो जीव

.. सुरकुतलेल्या हातांमधली मऊशार वीण हो 

परवा म्हणालास सरतंय वय, पडदा पडेल खेळावर

..  मनात वाजत राहणारी आठवांची बीन हो 


- मंदार. 

No comments: