Tuesday, November 02, 2021

रंग माझा वेगळा - सुरेश भट

रंगुनी रंगात सा-या रंग माझा वेगळा, 

गुंतुनी गुंत्यात सा-या पाय माझा मोकळा


सुरेश भटांचं आयुष्य वादळी होतं. मला वाटतं हे गीत त्यांनी बरंचसं स्वत:च्या अनुभवांवर लिहिलं आहे. 

आयुष्यातले उतार-चढाव बहुतेकांच्या नशिबी असतातच. पण सामान्यांच्या मानाने भटांच्या वाट्याला आलेले अनुभव अतिशय खडतर होते. पायाला पोलियो, शालेय जीवनातलं अपयश, त्यामुळे घरात आणि बाहेर दुय्यम वागणूक आणि उपेक्षा, आणि कालांतराने स्वत:ला काही अंशी सिद्ध करून देखील वाट्याला आलेली परकेपणाची भावना. 

ह्या सगळ्यातून भटांसारखा कलंदर माणूस उत्कटतेनं जगत राहतो. अडचणी-दु:ख हे सहन करत असतानाही ते एक आपला वेगळा ठसा उमटवतात, आपला असा एक विलक्षण परीघ निर्माण करतात, आणि तो उत्तरोत्तर वाढवत नेतात. हे गीत म्हणजे या प्रवासाची कहाणी आहे. 

रंगुनी रंगात सा-या रंग माझा वेगळा, 

गुंतुनी गुंत्यात सा-या पाय माझा मोकळा

वाट्याला आलेली सुखं-दु:खं भोगताना आपला एक वेगळा रंग-ढंग आकार घेत जातो. प्राक्तन कोणाला चुकत नाही, पण भटांसारखे कलंदर ह्या जगरहाटीत गुंतूनही निराळीच उंची गाठतात.


भोग जे येती कपाळी ते सुखाने भोगतो;

अन्‌ कळ्या झाल्या कधीच्या सोशिल्या ज्याच्या कळा !

ह्या सोसलेल्या कळांच्या कळ्या-फुलं करण्याचा कलंदरपणा भटांसारख्यांकडेच असतो. भोवताली कितीही विदारक परिस्थिती असेल तरी आपल्या आतल्या प्रेरणेने काही लोक त्या चिखलातही कमळं फुलवतात. (ह्याची पराकोटीची साक्ष देतात ज्ञानेश्वरांनी आपल्या पाठीवर भाजलेले मांडे, किंवा Victor Frankl सारख्यांचे नाझी छळछावणीतले अनुभव.)  आणि ह्यातून जात असताना फार थोड्या लोकांना भटांची खरी ओळख पटली आहे. एके ठिकाणी त्यांनी लिहिलंय, "जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला, मी इथे हे अमृताचे रोपटे रूजवून गेलो..!"


राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी

हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा !

दु:ख सुद्धा पूर्ण झोकून देऊन भोगता येतं. त्या वेळच्या अश्रूंची झालेली गाणी भटांची साथ करत राहतात. नेहेमी त्यांच्या ओठांवर येत राहतात. इथे पुन्हा पुन्हा वाट्याला येणारी काही एक प्रकारची दु:खं भट सांगतायत - जी त्यांच्या आसपास घोटाळत राहतात - जणू त्यांना भटांचा लळा लागलाय!  भटांचाच एक शेर आहे -  "प्राण जाताना दग्याचा मी कुठे आरोप केला ? ओळखीच्या माणसांचे ओळखीचे घाव होते.."  हे असे ओळखीचेच घाव पचवत भट पुढे जात राहतात.


कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो

अन्‌ कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ?

अन्याय, अवहेलना, उपेक्षा सहन करत करत भट स्वत:ला सावरू बघतात. पण हे करत असताना बाकीच्यांच्या वाटेला येणारं साधं आयुष्य, त्यातल्या लहान पण सोनेरी क्षणांना ते पारखे राहून जातात. 


सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा :

"चालणारा पांगळा अन्‌ पाहणारा आंधळा !"

ह्या प्रवासाच्या एका टप्प्यावर स्वत:ला नुसतं सावरूनच नाही, तर फुलवून भट प्रस्थापित होतात. एक उदाहरण म्हणजे बीएला दोनदा नापास झालेल्या सुरेश भटांचा ‘रंग माझा वेगळा’ हा काव्यसंग्रह एम.ए.साठी अभ्यासक्रमात क्रमिक पुस्तक म्हणून ठेवला जातो. पण हे होत असतानाही, स्वत:चे काही कर्तृत्व नसणा-यांनी (खोट्या मार्गदर्शकांनी) त्यांची उपेक्षाच केली. भटांच्या आयुष्याला एखाद-दोन विशेषणांत बंदिस्त करून त्यांच्या कामगिरीला छेद देण्याचा, कमी लेखण्याचा प्रयत्न झाला.. 


माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :

माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !


इथे शेवटच्या शेरात भट प्रखरपणाने प्रकट होतात. हा सगळा प्रवास हा फक्त सुरेश भट ह्या व्यक्तीच्या संघर्षाचा नसून, त्यांच्या कलंदर जगण्याने प्रेरित होणा-या अनेकांचा आहे. जेव्हा सगळीकडे अनीती पसरली आहे, दिलदारपणा संपला आहे, एकमेकांनी फक्त खाली ओढण्याचा खेळ चालला आहे, अश्या माणसांनी स्वत:च निर्माण केलेल्या मध्यरात्री, भटांसारखा एक कलंदर सूर्यासारखा हिंडतो आहे. आपल्या परिघातला अंधार निपटून टाकतो आहे. आपल्यासारखे उत्कट जगणारे कोणी शोधतो आहे. अश्या पेटून जगणा-यांबद्दल भटांनी लिहिलंय - "जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा, विजा घेऊन येणा-या पिढ्यांशी बोलतो आम्ही!"


भटसाहेबांसारखा गीतकार-गज़लकार पुन्हा होणं नाही.. त्यांच्या प्रतिभेला आणि जीवनदृष्टीला नकळत हात जोडले जातात! 

No comments: