Monday, October 07, 2024

आहे पण, अन् नाही पण..!

जरा तुझ्याशी भांडायाचे आहे पण अन् नाही पण
जरा स्वत:शी जुळवायाचे आहे पण अन् नाही पण

कुणी ऐकतो मख्खपणे अन् कुणी चघळतो अफवाही  
मनातले सल सांगायाचे आहे पण अन् नाही पण

किती ऐकले पोक्त इशारे, टोले, सल्ले प्रेमाचे
फक्त स्वत:चे ऐकायाचे आहे पण अन् नाही पण

करायचे ते केले नाही दिवसा स्वप्ने बहुरंगी
मारुन-मुटकुन सजवायाचे आहे पण अन् नाही पण

जादूच्या ह्या मंचापुढती तर्काचे हे सोंग फुके
जरा-जरासे लपवायाचे आहे पण अन् नाही पण

भाळावरच्या रेषांबद्दल धन्यवाद अन् गार्‍हाणे
आपण अपुले रेखायाचे आहे पण अन् नाही पण

 - मंदार.

Sunday, August 11, 2024

संक्रमण


मी छाटल्या ठिकाणी उमलून आज आलो
ग्रीष्मातला बहावा होऊन आज आलो

चांभारचौकश्यांना चकवून आज आलो
कुप्रश्न धाडसाचे उठवून आज आलो

वेड्यांमुखी प्रशंसा वदवून आज आलो
हेटाळणीस त्यांच्या टाळून आज आलो

जे लागले जिव्हारी लपवून आज आलो
मौनात संयमाला सजवून आज आलो

चिंता - नव्हे - चितांना फसवून आज आलो
माया अशाश्वताची सोडून आज आलो

- मंदार.