Monday, September 10, 2007

रंग !?

काय असतो आनंदाचा रंग, दु:खाचा आणि वेदनेचा ?
करपलेल्या मनांचा अन् हरपलेल्या भानाचा ?

कुठल्या रंगाचा असतो, ह्याने त्याचा केलेला छळ ?
काळे-निळेच दिसतात ना, त्या पाठींवरचे वळ ?

काळाच रंग चोरीचा, अन् काळाच बेकारीचा
काळा लांछनाचा आणि काळा गुलामीचा !

काळी गल्ली खुन्यांची, अन् काळा बोळ डाकूंचा
काळी पावलं अशुभाची, काळा काळ काळ्यांचा !

काळे ते गरीबच, आणि काळे तेच भिकार
माणसांच्या जंगलात होते काळ्यांचीच शिकार :(

-- मंदार.

("चोरी झाली? - काळाच असणार !"
"रात्री जाऊ नका तिकडे! गल्लीत काळे आहेत !"
"तो कसला आलाय उच्चशिक्षित ? काळा आहे तो !"
:।
२१ व्या शतकात मोठमोठ्या घोषणा देऊन शिरणारे आपण सगळे; कातडीच्या रंगाला बरोबर घेऊन चालत राहणार, का त्यापलीकडे जाऊन मनं मोकळी सताड उघडी ठेवून चांगली माणसं म्हणून जगणार?)

Wednesday, May 23, 2007

गानसंजीवनी

गेल्या सत्रात फार सुंदर संगीत कार्यक्रमांना जायची संधी मिळाली. आणि पुन्हा एकदा एखाद्या कलाकाराच्या समोर बसून त्यांचं गायन-वादन ऐकण्याची मजा घेता आली. त्या आनंदाबद्दल शब्दात काय आणि किती सांगू? गाणं-बजावणं ऐकून मन आनंदानं उड्या मारतं म्हणजे काय होतं ते कळलं पुन्हा.

एखाद्या प्रशस्त सभागृहात एक साधंसंच, लाकडी स्टेज. माफकच सजवलेलं. एखादी पातळशी गादी अंथरलेली. त्यावर पांढरी स्वच्छ चादर. एखादा पाण्याचा गडवा. असलीच तर मोग-याची ताजी टवटवीत फुलं. मग ती वाद्यं - संवादिनी, तबल्याची जोडी आणि तानपुरा. जणू पूजेसाठी सिद्ध केलेली पळी-पंचपात्री. जणू जमून येणा-या विड्यातला पान-कात-चुना. मग त्या आसनांवर येऊन बसतात ते त्या गानदेवतेचे, सिद्धकलाहस्त नटराजाचे पुजारी - गतजन्मीचे यक्ष-गंधर्वच. ह्या पृथ्वीवर त्यांनी जन्म घेणं हा त्यांना जणू शाप, आणि त्यांची कला 'याचि देही याचि कानी' अनुभवायला मिळणं हे आम्हाला मिळालेलं वरदान. आपलं षड्ज हे सुरेख नाव सार्थ करणा-या 'सा' ची आळवणी होते, आणि मग सुरू होते 'श्रवणभक्ती' :)

संजीव अभ्यंकरांची एक मैफल झाली इथे, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. निखळ आनंदाचा उच्चतम अनुभव होता. संजीवजींनी वयाच्या ११ व्या वर्षीच कार्यक्रम करायला सुरुवात केली. पंडित जसराजांकडून गाणं शिकायला लागायच्या आधीपासूनच त्यांच्या मातोश्रींना त्यांच्या गळ्यातली ताकद दिसली होती.
पंडित जसराजांच्या गाण्याचा दीवाना असल्यामुळे त्यांच्या ह्या शिष्याच्या गाण्याच्या प्रेमात मी नकळत पडलो होतो. आता त्यांना प्रत्यक्ष ऐकायला मिळणार म्हणून उत्सुक मनाने गेलो. आणि एक सुंदर सुरेल संध्याकाळ पदरात घातली त्यांनी.
दिनकी पूरिया ने सुरुवात करून त्यांनी पहिल्या काही क्षणातच जिंकलं आम्हाला. मध्येच, "तुम्ही सगळे श्रोते मधल्या रांगेत येऊन बसा, म्हणजे मला तुम्हाला पाहता येईल" अशी गोड विनंतीवजा सूचनाही केली. त्यांचा मधाळ आवाज आणि स्मित पाहून कुणीच ती सूचना डावलली नाही. आणि मग एखाद्या सराईत जादूगाराच्या पोतडीतून अद्भुत, सुंदर, मोहक आणि वेड लावणा-या चमत्कारिक गोष्टी बाहेर पडाव्यात, तश्या त्यांनी अनेक रचना, बंदिशी सादर केल्या. त्यात हंसध्वनि होता, कबिरांचं भजन होतं ..
"लगन बिन जागे ना निर्मोही
बिना लगन की प्रीत बावरी
ओस नीर जो धोई" ..
(ज्यात 'लगन' नाही, पूर्ण समर्पण नाही, अश्या प्रीतीला कबीर सुकून गेलेली विहीर - धोई - म्हणतायत.)

"हम तो रमते रामभरोसे, रजा करे सो होई
बिन कृपा सतगुरु नहि पावै लाख जतन करे कोई
कहे कबीर सुनो भाई साधो, गुरुबिन मुक्ति न होई" ..

संजीवजी गात होते. लहान मुलाच्या चेह-यावर जसं निखळ, गोंडस, निरागस हसू खुलतं तसं हसू मनात फुलत होतं. कसल्या उपमा द्यायच्या त्या आनंदाला? कसल्या प्रतिमांनी शब्दात बांधायचं? अप्रतिम होतं ते सगळंच. अवर्णनीय. इतका उत्कटपणे आनंद देणारं क्वचित अनुभवायला मिळतं.
मैफल सुरू होताना संध्याकाळ होत होती. दिवसभर कामात गुंतलेला आपला प्रियकर घरी येणार म्हणून प्रिया आतुरतेनं त्याची वाट पाहात होती. प्रियकराचं मन वेगाने धावत तिच्याकडे निघालं होतं.

"दिन भर तो मैं दुनिया के धंदों में खोया रहा,
जब दीवारों से धूप ढली, तुम याद आये, तुम याद आये" अशी अवस्था होती त्याची.

मग संधिप्रकाश विरघळून गेला, रात्रीच्या अंधारात. आतुरतेची जागा घेतली विरहाने. विरहाचं दु:ख झालं. मग संशय डोकावला. मग आपल्या प्राणप्रिय सख्याचं मन कुणा सवतीनं काबीज केलं असेल ह्या विचारात गढून गेली बिचारी विरहिणी. राग आला तिला आपल्या सख्याचा.

"तुम हम संग जी न बोलो .. पिहरवा ..
औरन से नेहा मिलावत हो, और हमसे करत तुम रार .."

मग कधीतरी रात्री उशिराच्या प्रहरी आला तिचा सखा. ती अजून घुश्श्यातच होती. सख्याने तिला समजवायचा खूप प्रयत्न केला - पण निष्फळ. काही ऐकेचना ती. म्हणाली:
"करत हो मीठी बतियां, कहां गंवायी सारी रतियां ..
कासे कहूं मन की बतिया, रैना गयी मोरी गिन गिन तारे
करत हो .."
नट भैरवातली ही सुंदर बंदिश ऐकल्यावर डोळ्यासमोर रुसलेली प्रिया उभी न राहिली तर सांगा !

खूप विनवण्यांनंतर शेवटी ती ऐकते त्याचं. आणि पुन्हा कधीही असा उशीर न करण्याचं वचन घेते त्याच्याकडून.

"अब मान ले, बालम मोरी बात, नाहक रार करो ना मोरे साथ .."
म्हणते, "नको तिथे प्रेम दाखवतोस तुझं, वेळेवर परत यायला मात्र नको ! सगळ्या मैत्रिणींसमोर मला जवळ खेचताना तुला लाज कशी नाही वाटत ? मी मात्र लज्जेने चूर होते तिथे !"
"निठुर नाथ तुम जोरी करत हो,
लाज आवत मोहे देखत सब सखियां साथ.."
.. नट भैरवाच्या प्रेमात पडायला एवढं पुरे आहे !

अशा भावनांच्या हिंदोळ्यावरून हे गायक आपल्याला घेऊन जातात.

पूजेच्या शेवटी जशी खणखणीत आरती असते, तसंच संजीवजी दोन सुंदर भजनं म्हणतात मैफिलीच्या शेवटाला. प्रेमी जीवांच्या शृंगाराचं गोड चित्र रंगवणारा त्यांचा आवाज आणखीनच स्निग्ध होऊन राम-कृष्णांची आळवणी करायला लागतो.

"तनु मेघश्याम मेळे, चित्तचातक निमाले ।
कीर्तीसुगंध तरुवरी, कूजे कोकिळा वैखरी ।
ध्यान लागले रामाचे, दु:ख हरले जन्माचे !"

आणि मग येतो नामदेवांचा अभंग -
"नाम गाऊ, नाम ध्याऊ, नामे विठोबासी पाहू ।"

आपण तृप्त होऊन जातो. भजनाचा शेवटचा गजर चालू असताना कधी उभे राहून आपण त्या पुजा-याला टाळ्यांनी दाद देतो, कळतही नाही. आपल्याला गानसंजीवनी देणारा संजीव नावाचा तो गंधर्व हात छातीशी घेऊन जणू तो गजर मनाच्या कोप-यात साठवून घेत असतो ..

Wednesday, April 18, 2007

वास्तव

उमलणे हा का कळ्यांचा दोष आहे ?
छाटणारा अजुन का निर्दोष आहे ?

उमलण्याआधीच खुडती हात पापी
सज्जनांच्या व्यर्थ कंठी शोष आहे

पालनाची काळजी नाही कुणाला !
’बालदिनि'चा कोरडा उद्घोष आहे

वर्तमानी शोषिले त्याच्या भविष्या
वास्तवाचा शाप, दैवी रोष आहे

पाप केले राक्षसांनी अंकुरांवर
फोडिला भावी सुखाचा कोष आहे

-- मंदार.

(भारत सरकारने नुकत्याच प्रकाशित केलेल्या लहान मुलांच्या शारीरिक शोषणाबद्दलच्या अहवालाकडे पाहून खूप चीड, उद्वेग, शरम वाटली. त्यानंतर जे पांढ-यावर काळं केलं ते हे.)

Wednesday, February 07, 2007

विडंबन - गुंतता हृदय हे ..

(मूळ नाट्यगीत:

गुंतता हृदय हे या कमलदलाच्या पाशी
हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी ..

या इथे जाहला संगम दो सरितांचा
प्राक्तनी आपुल्या योग तिथे प्रीतीचा
अद्वैत आपुले घडता या तीर्थाशी
हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी ..

दुर्दैवीं आपण दुरावलो या देही
सहवास संपता डागळले ऋण तेही
स्मर एकच तेव्हा सखये निज हृदयाशी
हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी ..)

lyrics: thanks to Gayatri


************


माझा विडंबनाचा प्रयत्न :

झिंगता तू असा त्या गुत्त्याच्यापाशी
हा सोमगंध परिमळे तुझ्या अंगाशी ..

या इथे जाहली गंमत दो पेल्यांची
प्राशुनी त्या रसा अनुभूती स्वर्गाची
अर्वाच्य बरळिशी बसुनी कट्टयापाशी
हा सोमगंध परिमळे तुझ्या अंगाशी ..

दुर्दैवी तू पण, झिंगुन जाशी गेही
रसराज संपला, संपविले ऋण तेही
स्मर ते दिन आता सखया निज हृदयाशी
हा सोमगंध परिमळे तुझ्या अंगाशी ..

-- मंदार.


tags: guntata hriday he hruday jitendra abhisheki ramdas kamat

Monday, January 29, 2007

मीरेचा पथिक

अरुणोदय झाला ना अजुनी, उठली विरही मीरा,
सुस्नात होतसे दोन पळातच तिज ना धरवी धीरा.
"मेरो तो गिरिधर गोपाल, दूसरो नही कोई"
मीरा कृष्णारंगे मिसळुन निळी-सावळी होई.

वंशी हाती उभा घेउनी तो मीरेचा श्याम,
तो लक्ष्मीपति, तो योगेश्वर, तो सीतेचा राम.
त्या श्याममूर्तिच्या दर्शनास धावे मीरा अति वेगे,
ती राजगृहे ती वैभवसृष्टी सगळी सोडुन मागे.

प्राणप्रियतम मुरलिधराच्या भेटीची तिज ओढ,
"अनंत-माधव-केशव-हरि" ती नाम आळवी गोड.
त्या वेळी कुणि तहानलेल्या एकाकी पथिकास,
पाही मीरा थकलेल्या त्या अनाथ जीवास.

पाउल मीरेचे थांबे, ती जाई जवळी त्याच्या,
प्रेमाने अन करुणेने पाणी घाली मुखि त्याच्या.
किति प्रहरांचा तृषार्त यात्री, शांत तृप्त तो होई,
जीवताप जी पळवुनी लावी मीरा ती, जणु आई.

तो मीरेला म्हणे, सखी तू, माझी जणु प्रिय आई,
तुझे दु:ख विसरुनी मजवरी फुंकर घालुनी जाई.
सांगे मीरा पथिकाला, "मज तुझ्यात दिसतो श्याम,
जरा निराळी छबि दोघांची, जरा निराळे नाम."

आणि म्हणे, "मी काही मोठे पुण्यकर्म ना केले,
तुझ्यातल्या माझ्याच निळ्याला सर्व समर्पण केले.
तुझ्यावरी ते प्रेम नव्हे रे, जे कृष्णावर आहे,
तुला दिले ते प्रेम तुझे ना, ते तर त्याचे आहे!"

"माझे हे वागणे नको रे, लावुन घेवु मनाला"
ऐकुन गदगदला तो, म्हणतो प्रेमरूप मीरेला:
"कुठल्या रूपे प्रेम दिलेस, ना मला पामरा ठावे,
तू भरभरून सानंदे दिधले, हेच मनाला भावे."

-- मंदार.

Sunday, December 03, 2006

अब्द अब्द मनी येते ..

अब्द अब्द मनी येते सखे तुझी आठवण,
तुझ्या केसांतली फुलं, पावलातले पैंजण

तुझा गंध माझा वारा, तुझा चांद माझा तारा,
तू सूर बासरीचा, मी त्या पावसाच्या धारा

माझ्या पणतीची वात तू ठोका काळजात,
बाहुली माझी, तू माझिया डोळ्यात

वाटेवरचा माझ्या तू प्राजक्ताचा सडा,
दोघांच्या शाळेतला एक वेडावणारा धडा

-- मंदार.

Wednesday, November 29, 2006

कुछ बना-बिगड़ा ...

हमेशा कि तरह, आज भी समंदर किनारे बैठा था वो । याद कर रहा था किसी को, जो उसे भुलाकर कहीं दूर चली गई थी । रेत में यूं मायूस बैठे बैठे उसे याद आया एक अजी़ज़ दोस्त ने सुनाया हुआ एक शेर -

"समंदर किनारे बैठ यूंही रेत में फेर रहा था उंगलियां,
गौर से देखा तो तेरी तस्वीर उभर आयी थी .. "


आह!
उस दिल से निकली आह का कुछ ये बन गया:

हाय! खू-ए-दिल मेरा प्यार बन गया
हाय! खून-ए-दिल खू-ए-यार बन गया

जब खो गया सपना, अश्कबार बन गया
उस ग़म में ये जहां एक मझार बन गया

हाल-ए-दिल छुपाया तो हम 'बदमाश' हो गये,
जो किया इजहार तो मैं गुनहगार बन गया

वो दिन था कि चली थी नसीम चमन में,
एक ये दिन है कि नफस तूफान बन गया

-- मंदार.

[खू = आदत; अश्कबार = अश्क बहानेवाला;
मझार = कब्र; नसीम = सुहानी हवा; नफस = सांस]

Sunday, November 26, 2006

माझ्यातल्या तुला ..

ते चाफ्याचं फूल.
तुझी नाजुकशी वेणी.
त्या माळरानावरचा पावा.
तो दूर डोंगरातला झरा.
थांबलेला चातक पक्षी.
मग वळवाचा पाऊस.
तोच मातीचा वास.
ती उबदार शेकोटी.
तुझ्या ओढणीवरची नक्षी.
त्या आभाळाची निळाई.
तीच टेकडीमागची आमराई.
तुझा गोंडस चेहरा.
तेच निरागस हसू.
उधाणलेला समुद्र.
हलकं हलकं मन.
तू दिलेलं मोरपीस.

काय आठवू, काय नको .. ?

मुकं मन, रितं मन.
भरलं मन, रडलं मन.
राहिलो मी, गेलीस तू.
तुझा मी, तुझीच तू.

देशील ते क्षण, जे मला कधी मिळालेच नाहीत .. ?
नाहीतर, फक्त एवढं कर - मला पुन्हा तुझ्या प्रेमात पडू दे.

मला .. पुन्हा एकदा प्रेमात पडायचंय !
तुझ्याच .. पुन्हा एकदा प्रेमात पडायचंय !

तोच जोश, तेच वेड, तोच एक थरार,
पुन्हा एक वादळ मला माझ्यात उठवायचंय !

तीच पहिली नजरानजर, तोच पहिला स्पर्श,
निसटलेल्या क्षणांना पुन्हा भरभरून जगायचंय !

काळोखात रातराणी, आलीस माझ्या स्वप्नात,
तेच स्वप्न पुन्हा एकदा जागेपणी पाहायचंय !

Friday, November 10, 2006

पाडलेले शेर :P

हम वो भंवरे नही जो चखने मय निकले,
उन आंखों से पीते हैं जिन आंखों पे दम निकले

कभी तो नजर को फेर हमें देख ले जालिम,
कभी तो उन आंखों से नोश-ए-रहम निकले

हंसता है ये जमाना हमारी इस वहशत पे,
बेपर्वाह हैं हम जो वो ऐसे बे-शरम निकले

Sunday, October 29, 2006

ना लिख पाऊंगा हर्फ़-ए-इश्क तुझको मैं कभी,
सोचा लिख देता हूं कोई एक ग़ज़ल ही सही


तेरा साथ ना हुआ हासिल तेरी यादें ही सही,
तेरा हाथ न है हाथ में, तेरा एहसास ही सही

बारिश की राह तकती आंख में भर गये आंसूं,
गूंजते बादलों के साथ वो अकेली शाम ही सही

क्या बात अगर तुझे कभी पा न सकूंगा मैं
तेरे आशिकों कि शुमार में मेरा नाम ही सही

आंखें न देख सकती तुझे, न ये कान सुनते हैं,
"तू है, यहीं कहीं" दिल में ये एक खयाल ही सही

माना मेरे नसीब में नही है तेरे लब का जाम
तेरी जुबां पे उस रोज आया हुआ मेरा नाम ही सही

न बन सका तेरा आशिक, तेरा मजनू, तेरा बालम
तेरे चाहनेवालों में से मैं एक कोई 'बेनाम' ही सही

मीर आणि काफ़िर

एका शांतशा संध्याकाळी, जगजित सिंगांच्या आवाजातली माझी एक आवडती ग़ज़ल ऐकत होतो.

"पत्ता पत्ता बूटा बूटा हाल हमारा जाने हैं
जाने न जाने गुल ही न जाने, बाग तो सारा जाने हैं"
...अप्रतिम !

ही ग़ज़ल लिहिली होती मीर तकी मीर यांनी. 18 व्या शतकातले मोठे शायर. मिर्झा़ असदुल्लां खां गा़लिब सारख्यांनी मीर यांच्या शायरीचा आदराने उल्लेख केला आहे, मीर यांना उर्दू शायरीचे 'ईमाम' मानून. गुलजारनी बनवलेल्या "मिर्झा गा़लिब" या दूरदर्शनवरच्या मालिकेत तसा एक प्रसंगही दाखवला आहे. मीर यांचा हा शेर ऐकून गा़लिब उद्गारले होते:

"रेख्ते के तुम ही एक उस्ताद नही हो गा़लिब,
कहते हैं अगले जमाने में कोई मीर भी था"

मीर यांचा आणखी एक शेर वाचला काही दिवसांपूर्वी :

"सख्त काफ़िर था जिसने पहले 'मीर',
मज़हब-ए-इश्क़ इख़्तियार किया .. "

'काफ़िर'या कल्पनेवर विचार करताना माझ्या मनात आलं,

"पथ्थर के बूतों के दीवाने होते हैं काफ़िर,
ना बूतों में जान हैं ना जिगरवाले हैं काफ़िर"

आणि, मजहब-ए-इश्क यावरच बोलायचं झालं तर,

"फ़र्क न है मजहब-ए-इश्क में मालिक-बन्दे का,
गो कत्ल करता है मालिक, सीने से भी लगाता है"

Monday, February 27, 2006

मन माझे ..

मन माझे अवखळ, जसा झरा खळखळ,
नाही साचणे कुठेही, मस्त धावणे फेसाळ.

मन माझे मन माझे, चमकता काचखडा,
कधी फुटतो तुटतो, जातो अंगभर तडा.

मन माझे रानवारा, जसा वाहतो बेभान,
कधी झुळूक हवीशी, कधी भीषण तूफान.


मंद समईसारखे, मन माझे तेवणारे,
कधी होते रे विखारी, ते निखारे जळणारे.

स्वतःभोवती हे फिरे, मन माझे रे भोवरा,
धुंद आपल्या गतीत, गिरक्या घे गरगरा.

मन माझे आर्द्र घन, जसा नभी दाटलेला,
शतधारांनी करितो, ओलीचिंब या मातीला.

मन गवताची पाती, वाऱ्यावर डुलणारी,
कधी होते धारदार, तलवार ते दुधारी.

मन माझे काळी माती, मन सुपीक धरणी,
मळे फुलती स्वप्नांचे, वेड्या मनाची करणी.

मन रहाटगाडगे, जसे विहिरीवरचे,
कधी भरे काठोकाठ, रिक्त पुन्हा घट याचे.

इंद्रधनुष्य जसे की, ह्याचे अगणित रंग,
आणि जगाहून साऱ्या, याचा वेगळाच ढंग.

शांत सागरासारखे, मन माझे हे अथांग,
सुखदुःख भाव सारे, वरवरचे तरंग.


-- मंदार.

एका लग्नाची गोष्ट

सुप्रभाती रोज जाई कर्ण गंगेच्या जळी,
अर्घ्य देई सूर्यदेवा रिक्त करि तो ओंजळी.

दान अर्घ्यांचे तयाचे आणि सूर्याराधना,
व्रतीसमान चालती कधीच त्यास खंड ना.

परन्तु एका प्रभाती क्रम तयाचा मोडिला,
"वाचवा! बुडते जळी !" आक्रोश त्याने ऐकिला.

गंगेवरी पाणी भराया ललना कुणी आली असे,
पडून तोल जाउनी मग दूर वाहत जातसे.

कानी पडे ती साद अन् क्षणही न कर्ण दवडि तो,
युवतीला वाचवुनी काठांवर आणि तो.

खोल पाण्याच्या भयाने हरपली शुद्धी जिची,
हळूच घाटावर नदीच्या ठेवि तो काया तिची.

युवती, अति सुन्दरशी, कर्ण पाहत राहिला,
क्षणकाल ते अर्घ्यदान, साधना तो विसरला.

आणुनी निमिषात अपुले उत्तरीय कोरडे,
पुसण्या मुख हळुच तिचे, कर्ण तेथे धडपडे.

जाग स्पर्शाने तयाच्या, सुन्दरीला येतसे,
पाहुन राजस रूप त्याचे लाजुन ती हासतसे.

एक क्षण कर्णास वाटे सर्व सृष्टी थांबली,
होता दृष्टादृष्ट त्यांची, गंगाही मनि हासली !

पळभरातच कन्यका ती येतसे भानावरी,
मंदसे स्मित मग करून निघुन जाई सत्वरी.

"अरे! उत्तरीय माझे, घेऊन गेली सुन्दरी!
काय म्हणतिल, परत जाता, लोक हस्तिनापुरी?"

'वृषाली' असे ती कुमारी सूतकन्या लाघवी,
कर्णपत्नी होतसे मग, अंगराज्ञिपद भूषवी.

कर्णाचे पण 'तोपर्यंत' लक्ष नाही लागले,
मुख वृषालीचेच त्या, रविबिंब भासू लागले !

-- मंदार.

( शिवाजीराव सावंतांच्या "मृत्युंजय" मधल्या परिच्छेदावर आधारित )

प्रेमाची चारोळी ;)

जीव जिच्यावर जडला माझा, ती मुळी मज पाहि ना,
ज्यावर ती अनुरक्त हो, तो विरक्त जवळी घेइ ना,
प्राण ओवाळुनी टाकि कुणि अन्य मजवरि कन्यका,
ती, तो, मी, ही, मदनाचाहि धिक्कारच करि मी रसिका !

-- मंदार.


हा एका संस्कृत सुभाषिताचा अनुवाद आहे - 

यां चिन्तयामि सततं मयि सा विरक्ता,
साप्यन्यमिच्छति जनं सजनोऽन्यसक्तः।
अस्मत्कृते च परितुष्यति काचिदन्या, 
धिक्ताञ्च तञ्च मदनञ्च इमाञ्च माञ्च।।

स्मरण कुसुमाग्रजांचे

आज कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिन. १९४२ च्या लढ्यात "गर्जा जयजयकार क्रांतीचा" लिहिणारे कुसुमाग्रज. नटसम्राट सारखं नाटक ज्यांच्या लेखणीतून उतरलं, ते कुसुमाग्रज. एका बाजूला दिसतात कोलंबसाचे गर्वगीत, पृथ्वीचे गर्वगीत, मातीची दर्पोक्ती अशा कविता तर दुसरीकडे कालिदासाच्या मेघदूतातल्या रचनांवर आधारित कविता. त्यांनी लिहिलेलं वाचण्याचा आनंद नाही सांगता यायचा शब्दात. इथे त्यांच्या कवितांचा संग्रह तुम्ही पाहू शकाल.

"चला उभारा उंच शिडे ती गर्वाने वरती,
कथा या खुळ्या सागराला,
अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा,
किनारा तुला पामराला ! "

Sunday, February 26, 2006

ऊन ..

सकाळचं सुरेख कोवळं ऊन पडलंय. माझ्या बाल्कनीमधून हळूच आलंय आत. या कोवळ्या उन्हानं मला पहिल्यापासूनच वेड लावलं आहे. पुण्यातल्या आमच्या जुन्या वाड्यातल्या घरी आंघोळ करून झाल्यावर कोवळ्या उन्हात उभं राहायचो ते आठवतंय अजून. इतकी वर्षं मनात घर करून बसलेलं हे ऊन, माझ्या पामराच्या शब्दात -