Saturday, July 11, 2009

मालवगंध

कधीकधी अचानक खुळीसारखी थांबते मी जागीच. डोळे दूरच्या वाटेकडे, अंगभर रोमांच, जिभेवर मधगोडवा.. कानांत घुमणारी हाक, आणि मग तो वेडावणारा गंध. श्रावणातला मृद्गंधराज आणि अंगणात पानागणिक तटतटून फुलणा-या रातराणीचा वास - माझे जीव की प्राण! .. पण तू आलास आणि ते दोन्ही विसरून गेले रे. कसा आत आत भिनत गेलायस माझ्या! रूप-स्पर्श-रस-शब्दांतून त्या अनामिक गंधाकडे जाणं - जणू तारसप्तकातल्या गंधारापर्यंत चढणारी सुरेल तान.

तुझं रूप, माझ्या मारव्यातला कोमल ऋषभ .. रागाची सगळी अदाकारी एकहाती तोलून धरणारा. पहिल्यांदा दिसलास तोच मुळी नुकत्या उगवलेल्या पौर्णिमचंद्रासारखा. ती चांदमोहिनी उतरलीच नाही कधी. मग पाहणं घडलं ते शारीर डोळ्यांच्या पलीकडचं - 'दृष्टीचा डोळा पाहों मी गेले तंव। भीतरी पालटु झाला।'

मग तीव्र मध्यमाचा तो अधीरस्पर्श. खरंतर रोज दह्यादुधात माखणारे हात माझे - पण तुझ्या घट्टे पडलेल्या खरखरीत हातांचा स्पर्श हवाहवासाच वाटला, को-या नऊवारीसारखा. उत्कटता कळायला आवेगच दिसायला पाहिजे असं काही नाही.. तुझ्या संयतस्पर्शानं मध्यमाचं नाव तसंच सार्थ केलं.

दोन नवख्या व्यक्ती भेटल्यावर एकमेकांची सवय होईतो जाणारा वेळ, वाटणारं अवघडलेपण - आपल्या मारव्यामध्ये तो हेकट अचल पंचम असणार होताच कुठे? सोड. इतक्या सुरेल गोष्टीबद्दल बोलताना असले शब्दही नकोत.

शुद्ध धैवताचा निखळ, शांतरस आकंठ प्यायले, तो तुझ्याच ओठांनी. तोपर्यंत अनामगूढ वाटणारा धृतधैवत इतका मोकळा होऊन समोर आला.. त्याला चिकटवलेला सगळा फसवा चकवा क्षणात गळून पडला. इतका, की तो रूपऋषभाचा संवादी व्हावा.

माझी उरलीसुरली शिकार केली ती तुझ्या शब्दनिषादानं. त्याचं वेडच असं लागलं की 'मा निषाद' न म्हणता मी आपणहोऊन आपलं मस्तक अर्पण केलं. निषादाची खुमारी हीच, की त्यात आपल्या दोघांच्या एकाकार होण्याच्या भावषड्जाची चाहूल लागते मला.

माझ्या मारव्याच्या तानेचा कळस मात्र होता मालवगंध. बाकी सगळ्या सगळ्या शारीर संवेदना अत्यंत अचेतन, मंद वाटाव्यात असा हा तारगंधार. ऋषभ-धैवतासारखा त्यावर भावनटराजाचा पदन्यास होत नसेल - पण त्याला अश्या सहेतुक विरामाची गरजच नाही! तो आहेच मुळी जड जाणिवांच्या पलीकडला. 'होईल थोरपण जाणिवेचा भार ॥ दुरावती दूर पाय तुझे ॥'.. जिथे जाणिवांचाही भार होतो, अश्या उच्च ठिकाणी सजवलाय त्याला.

अशी सुरेल चढत गेलेली तानशलाका स्वगृही परत येते ती भावषड्जावर. आपलं एकत्र विकसित द्वैत त्याच्या लखलखीत रूपात पुढे येतं. काय सांगावं त्याबद्दल? तिथे जाणीव-नेणीव उरत नाही. काही समजून घ्यायचं नाही, काही समजावायचं नाही; फक्त त्या आनंदात डुंबायचं आहे.
'जाणीव नेणीव आघवी ॥ वोवाळीन तयावरुनि ॥'


मंदार.