Saturday, October 27, 2007

चॉकलेट :D

मला चॉकलेट फार आवडतं. इतकं की मी रोज ते खातोच खातो (हे फक्त माझ्या आईला सांगू नका). कधी दुधात घालून, कधी नुसतंच. कधी त्याची ब्राउनी बनवून, तर कधी आइस्क्रीममधून :D
हेच काय, मी सगळ्यात पहिलं जे गाणं शिकलो ते ’चॉकलेटचा बंगला’च. केळ्यानंतर चॉकलेट हीच जगातली सगळ्यात चांगली गोष्ट आहे, असं माझं आणि मक्याचं मत आहे!

मी इतकं चॉकलेट खातो रोज, की ..

उठल्यावर चॉकलेट खातो, झोपताना चॉकलेट घेतो
मी जेवायच्या आधी थोडे, थोडे नाश्त्याला घेतो

त्याशिवाय ना जात दिवस, रात्री करतो हाच नवस
उद्या मिळू दे आणखी देवा, खंडीभर चॉकलेटचा मेवा!

रात्री एकदा स्वप्नात माझ्या, मीच आलो मोठेपणचा
बघतो तर काय, झालो होतो, मी तर अख्खा चॉकलेटचा!

चॉकलेटचे होते हात-पाय, चॉकलेटचेच होते डोळे
कानांच्या जागी पण दिसले चॉकलेटचे करडे गोळे

बोटं तोंडात घातली मी, मग 'मोठा मी' म्हणे हळू
चॉकलेट खाणे पुरे करू रे, आता लागलंय मला कळू

तेव्हापासुन नवस बोलतो, एक नवा मी बाप्पाला
'मोठेपणचा मी' मिळू दे, मला उद्याच्या जेवणाला!

Monday, September 10, 2007

रंग !?

काय असतो आनंदाचा रंग, दु:खाचा आणि वेदनेचा ?
करपलेल्या मनांचा अन् हरपलेल्या भानाचा ?

कुठल्या रंगाचा असतो, ह्याने त्याचा केलेला छळ ?
काळे-निळेच दिसतात ना, त्या पाठींवरचे वळ ?

काळाच रंग चोरीचा, अन् काळाच बेकारीचा
काळा लांछनाचा आणि काळा गुलामीचा !

काळी गल्ली खुन्यांची, अन् काळा बोळ डाकूंचा
काळी पावलं अशुभाची, काळा काळ काळ्यांचा !

काळे ते गरीबच, आणि काळे तेच भिकार
माणसांच्या जंगलात होते काळ्यांचीच शिकार :(

-- मंदार.

("चोरी झाली? - काळाच असणार !"
"रात्री जाऊ नका तिकडे! गल्लीत काळे आहेत !"
"तो कसला आलाय उच्चशिक्षित ? काळा आहे तो !"
:।
२१ व्या शतकात मोठमोठ्या घोषणा देऊन शिरणारे आपण सगळे; कातडीच्या रंगाला बरोबर घेऊन चालत राहणार, का त्यापलीकडे जाऊन मनं मोकळी सताड उघडी ठेवून चांगली माणसं म्हणून जगणार?)

Wednesday, May 23, 2007

गानसंजीवनी

गेल्या सत्रात फार सुंदर संगीत कार्यक्रमांना जायची संधी मिळाली. आणि पुन्हा एकदा एखाद्या कलाकाराच्या समोर बसून त्यांचं गायन-वादन ऐकण्याची मजा घेता आली. त्या आनंदाबद्दल शब्दात काय आणि किती सांगू? गाणं-बजावणं ऐकून मन आनंदानं उड्या मारतं म्हणजे काय होतं ते कळलं पुन्हा.

एखाद्या प्रशस्त सभागृहात एक साधंसंच, लाकडी स्टेज. माफकच सजवलेलं. एखादी पातळशी गादी अंथरलेली. त्यावर पांढरी स्वच्छ चादर. एखादा पाण्याचा गडवा. असलीच तर मोग-याची ताजी टवटवीत फुलं. मग ती वाद्यं - संवादिनी, तबल्याची जोडी आणि तानपुरा. जणू पूजेसाठी सिद्ध केलेली पळी-पंचपात्री. जणू जमून येणा-या विड्यातला पान-कात-चुना. मग त्या आसनांवर येऊन बसतात ते त्या गानदेवतेचे, सिद्धकलाहस्त नटराजाचे पुजारी - गतजन्मीचे यक्ष-गंधर्वच. ह्या पृथ्वीवर त्यांनी जन्म घेणं हा त्यांना जणू शाप, आणि त्यांची कला 'याचि देही याचि कानी' अनुभवायला मिळणं हे आम्हाला मिळालेलं वरदान. आपलं षड्ज हे सुरेख नाव सार्थ करणा-या 'सा' ची आळवणी होते, आणि मग सुरू होते 'श्रवणभक्ती' :)

संजीव अभ्यंकरांची एक मैफल झाली इथे, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. निखळ आनंदाचा उच्चतम अनुभव होता. संजीवजींनी वयाच्या ११ व्या वर्षीच कार्यक्रम करायला सुरुवात केली. पंडित जसराजांकडून गाणं शिकायला लागायच्या आधीपासूनच त्यांच्या मातोश्रींना त्यांच्या गळ्यातली ताकद दिसली होती.
पंडित जसराजांच्या गाण्याचा दीवाना असल्यामुळे त्यांच्या ह्या शिष्याच्या गाण्याच्या प्रेमात मी नकळत पडलो होतो. आता त्यांना प्रत्यक्ष ऐकायला मिळणार म्हणून उत्सुक मनाने गेलो. आणि एक सुंदर सुरेल संध्याकाळ पदरात घातली त्यांनी.
दिनकी पूरिया ने सुरुवात करून त्यांनी पहिल्या काही क्षणातच जिंकलं आम्हाला. मध्येच, "तुम्ही सगळे श्रोते मधल्या रांगेत येऊन बसा, म्हणजे मला तुम्हाला पाहता येईल" अशी गोड विनंतीवजा सूचनाही केली. त्यांचा मधाळ आवाज आणि स्मित पाहून कुणीच ती सूचना डावलली नाही. आणि मग एखाद्या सराईत जादूगाराच्या पोतडीतून अद्भुत, सुंदर, मोहक आणि वेड लावणा-या चमत्कारिक गोष्टी बाहेर पडाव्यात, तश्या त्यांनी अनेक रचना, बंदिशी सादर केल्या. त्यात हंसध्वनि होता, कबिरांचं भजन होतं ..
"लगन बिन जागे ना निर्मोही
बिना लगन की प्रीत बावरी
ओस नीर जो धोई" ..
(ज्यात 'लगन' नाही, पूर्ण समर्पण नाही, अश्या प्रीतीला कबीर सुकून गेलेली विहीर - धोई - म्हणतायत.)

"हम तो रमते रामभरोसे, रजा करे सो होई
बिन कृपा सतगुरु नहि पावै लाख जतन करे कोई
कहे कबीर सुनो भाई साधो, गुरुबिन मुक्ति न होई" ..

संजीवजी गात होते. लहान मुलाच्या चेह-यावर जसं निखळ, गोंडस, निरागस हसू खुलतं तसं हसू मनात फुलत होतं. कसल्या उपमा द्यायच्या त्या आनंदाला? कसल्या प्रतिमांनी शब्दात बांधायचं? अप्रतिम होतं ते सगळंच. अवर्णनीय. इतका उत्कटपणे आनंद देणारं क्वचित अनुभवायला मिळतं.
मैफल सुरू होताना संध्याकाळ होत होती. दिवसभर कामात गुंतलेला आपला प्रियकर घरी येणार म्हणून प्रिया आतुरतेनं त्याची वाट पाहात होती. प्रियकराचं मन वेगाने धावत तिच्याकडे निघालं होतं.

"दिन भर तो मैं दुनिया के धंदों में खोया रहा,
जब दीवारों से धूप ढली, तुम याद आये, तुम याद आये" अशी अवस्था होती त्याची.

मग संधिप्रकाश विरघळून गेला, रात्रीच्या अंधारात. आतुरतेची जागा घेतली विरहाने. विरहाचं दु:ख झालं. मग संशय डोकावला. मग आपल्या प्राणप्रिय सख्याचं मन कुणा सवतीनं काबीज केलं असेल ह्या विचारात गढून गेली बिचारी विरहिणी. राग आला तिला आपल्या सख्याचा.

"तुम हम संग जी न बोलो .. पिहरवा ..
औरन से नेहा मिलावत हो, और हमसे करत तुम रार .."

मग कधीतरी रात्री उशिराच्या प्रहरी आला तिचा सखा. ती अजून घुश्श्यातच होती. सख्याने तिला समजवायचा खूप प्रयत्न केला - पण निष्फळ. काही ऐकेचना ती. म्हणाली:
"करत हो मीठी बतियां, कहां गंवायी सारी रतियां ..
कासे कहूं मन की बतिया, रैना गयी मोरी गिन गिन तारे
करत हो .."
नट भैरवातली ही सुंदर बंदिश ऐकल्यावर डोळ्यासमोर रुसलेली प्रिया उभी न राहिली तर सांगा !

खूप विनवण्यांनंतर शेवटी ती ऐकते त्याचं. आणि पुन्हा कधीही असा उशीर न करण्याचं वचन घेते त्याच्याकडून.

"अब मान ले, बालम मोरी बात, नाहक रार करो ना मोरे साथ .."
म्हणते, "नको तिथे प्रेम दाखवतोस तुझं, वेळेवर परत यायला मात्र नको ! सगळ्या मैत्रिणींसमोर मला जवळ खेचताना तुला लाज कशी नाही वाटत ? मी मात्र लज्जेने चूर होते तिथे !"
"निठुर नाथ तुम जोरी करत हो,
लाज आवत मोहे देखत सब सखियां साथ.."
.. नट भैरवाच्या प्रेमात पडायला एवढं पुरे आहे !

अशा भावनांच्या हिंदोळ्यावरून हे गायक आपल्याला घेऊन जातात.

पूजेच्या शेवटी जशी खणखणीत आरती असते, तसंच संजीवजी दोन सुंदर भजनं म्हणतात मैफिलीच्या शेवटाला. प्रेमी जीवांच्या शृंगाराचं गोड चित्र रंगवणारा त्यांचा आवाज आणखीनच स्निग्ध होऊन राम-कृष्णांची आळवणी करायला लागतो.

"तनु मेघश्याम मेळे, चित्तचातक निमाले ।
कीर्तीसुगंध तरुवरी, कूजे कोकिळा वैखरी ।
ध्यान लागले रामाचे, दु:ख हरले जन्माचे !"

आणि मग येतो नामदेवांचा अभंग -
"नाम गाऊ, नाम ध्याऊ, नामे विठोबासी पाहू ।"

आपण तृप्त होऊन जातो. भजनाचा शेवटचा गजर चालू असताना कधी उभे राहून आपण त्या पुजा-याला टाळ्यांनी दाद देतो, कळतही नाही. आपल्याला गानसंजीवनी देणारा संजीव नावाचा तो गंधर्व हात छातीशी घेऊन जणू तो गजर मनाच्या कोप-यात साठवून घेत असतो ..

Wednesday, April 18, 2007

वास्तव

उमलणे हा का कळ्यांचा दोष आहे ?
छाटणारा अजुन का निर्दोष आहे ?

उमलण्याआधीच खुडती हात पापी
सज्जनांच्या व्यर्थ कंठी शोष आहे

पालनाची काळजी नाही कुणाला !
बालदिनि'चा पोकळा तो घोष आहे

वर्तमानी शोषिले त्याच्या भविष्या
वास्तवाचा शाप, दैवी रोष आहे

पाप केले राक्षसांनी अंकुरांवर
फोडिला भावी सुखाचा कोष आहे

-- मंदार.

(भारत सरकारने नुकत्याच प्रकाशित केलेल्या लहान मुलांच्या शारीरिक शोषणाबद्दलच्या अहवालाकडे पाहून खूप चीड, उद्वेग, शरम वाटली. त्यानंतर जे पांढ-यावर काळं केलं ते हे.)

Wednesday, February 07, 2007

विडंबन - गुंतता हृदय हे ..

(मूळ नाट्यगीत:

गुंतता हृदय हे या कमलदलाच्या पाशी
हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी ..

या इथे जाहला संगम दो सरितांचा
प्राक्तनी आपुल्या योग तिथे प्रीतीचा
अद्वैत आपुले घडता या तीर्थाशी
हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी ..

दुर्दैवीं आपण दुरावलो या देही
सहवास संपता डागळले ऋण तेही
स्मर एकच तेव्हा सखये निज हृदयाशी
हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी ..)

lyrics: thanks to Gayatri


************


माझा विडंबनाचा प्रयत्न :

झिंगता तू असा त्या गुत्त्याच्यापाशी
हा सोमगंध परिमळे तुझ्या अंगाशी ..

या इथे जाहली गंमत दो पेल्यांची
प्राशुनी त्या रसा अनुभूती स्वर्गाची
अर्वाच्य बरळिशी बसुनी कट्टयापाशी
हा सोमगंध परिमळे तुझ्या अंगाशी ..

दुर्दैवी तू पण, झिंगुन जाशी गेही
रसराज संपला, संपविले ऋण तेही
स्मर ते दिन आता सखया निज हृदयाशी
हा सोमगंध परिमळे तुझ्या अंगाशी ..

-- मंदार.


tags: guntata hriday he hruday jitendra abhisheki ramdas kamat

Monday, January 29, 2007

मीरेचा पथिक

अरुणोदय झाला ना अजुनी, उठली विरही मीरा,
सुस्नात होतसे दोन पळातच तिज ना धरवी धीरा.
"मेरो तो गिरिधर गोपाल, दूसरो नही कोई"
मीरा कृष्णारंगे मिसळुन निळी-सावळी होई.

वंशी हाती उभा घेउनी तो मीरेचा श्याम,
तो लक्ष्मीपति, तो योगेश्वर, तो सीतेचा राम.
त्या श्याममूर्तिच्या दर्शनास धावे मीरा अति वेगे,
ती राजगृहे ती वैभवसृष्टी सगळी सोडुन मागे.

प्राणप्रियतम मुरलिधराच्या भेटीची तिज ओढ,
"अनंत-माधव-केशव-हरि" ती नाम आळवी गोड.
त्या वेळी कुणि तहानलेल्या एकाकी पथिकास,
पाही मीरा थकलेल्या त्या अनाथ जीवास.

पाउल मीरेचे थांबे, ती जाई जवळी त्याच्या,
प्रेमाने अन करुणेने पाणी घाली मुखि त्याच्या.
किति प्रहरांचा तृषार्त यात्री, शांत तृप्त तो होई,
जीवताप जी पळवुनी लावी मीरा ती, जणु आई.

तो मीरेला म्हणे, सखी तू, माझी जणु प्रिय आई,
तुझे दु:ख विसरुनी मजवरी फुंकर घालुनी जाई.
सांगे मीरा पथिकाला, "मज तुझ्यात दिसतो श्याम,
जरा निराळी छबि दोघांची, जरा निराळे नाम."

आणि म्हणे, "मी काही मोठे पुण्यकर्म ना केले,
तुझ्यातल्या माझ्याच निळ्याला सर्व समर्पण केले.
तुझ्यावरी ते प्रेम नव्हे रे, जे कृष्णावर आहे,
तुला दिले ते प्रेम तुझे ना, ते तर त्याचे आहे!"

"माझे हे वागणे नको रे, लावुन घेवु मनाला"
ऐकुन गदगदला तो, म्हणतो प्रेमरूप मीरेला:
"कुठल्या रूपे प्रेम दिलेस, ना मला पामरा ठावे,
तू भरभरून सानंदे दिधले, हेच मनाला भावे."

-- मंदार.
There was an error in this gadget