Wednesday, October 10, 2018

कवडसे

स्तब्ध आकाशी उषेने
मुक्त यावे
पाखरांनी
​पानजाळीतून गावे  

सागराने श्रावणाचा 
मेघ व्हावे
अंतरीचे 
चिंब ओले दान द्यावे

पावसाने काळजाशी 
ऊन घ्यावे 
या नभाला
सप्तरंगी स्वप्न द्यावे

या​ नभाने चांदण्यांची
शाल ल्यावी​
​मोजताना​
या​ भुईला नीज यावी​


- मंदार.

Sunday, September 16, 2018

भंगार..!

​​अरे
 भंगार भंगार, नवे 
मिळे जुन्यावर
आधी
 तराजू लटके, चार
 
दमड्या 
हातावर 

अरे भंगार भंगार, वाया कधी म्हणू नये
मारकुट्या
 नव-याला, ’राया’ कधी म्हणू नये

अरे भंगार भंगार, 
मोह-
माया म्हणू नये
मावळतीच्या देण्याला, 
कधी ​
या
 म्हणू नये 

अरे भंगार भंगार, उरलं-सुरलं
 मायाजाल
मन​ भरलं भोगून, पाणी सोडावं खुशाल​

अरे भंगार भंगार, होई​ मोहाचा निरास​
देणा-याच्या​ हातांनाही, ​येई फुलांचा सुवास


- मंदार

Friday, January 08, 2016

प्रतिबिंब

असा गंंध वा-यावरी स्वार होता
तिच्या कुंतलांनी फुलारून जावे
असा बासरीचा निळा सूर येता
तिच्या रोमरोमात गाणे भिनावे

असे पान-पानात वैशाखसोने
बहाव्यापरी ती झळाळून यावी
असा श्रावणाचा धरास्पर्श होता
शहारून संकोचिनी ती मिटावी

असा मी रसासक्त रंगून जाता
तिने खोल माझ्यात हरवून जावे
पहाटे पहाटे तिला नीज येता
पुन्हा स्वप्नमार्गे मला बोलवावे - मंदार.

Thursday, January 07, 2016

यिन - यांग

मागण्यात काही चूक नाही, मागण्यात पाप नाही. 
पाप आहे ते लाचारीत, खोटेपणात, आणि कृतघ्नतेत. 


"ऊं! हे कशाला?" असं विचारण्याच्या ओघात माझ्यासारख्या नास्तिकानं विचारलं होतं - "कशाला जायचं जोगवा मागायला?" 

"ठीक आहे. जोगव्याचं समर्थन नाही करणार मी. आणि तसंही कसलेसे धार्मिक संकेत आणि रूढी-परंपरा ठेवूया बाजूला. पण असंही बघ. आपण मागण्याबाबत बोलू."

"बरं."

"अरे, मानानं जगणारी, टुकीनं संसार करणारी माणसं आपण. पण वेळ आली तर नि:संकोच, प्रसंगानुरूप, लाचार न होता पण परिस्थितीची जाणीव ठेवून आपल्याला समाजाकडून काही मागता आलं पाहिजे. आपल्याच धुंदीत नेहेमीच असणारे, दारावर आलेल्या भिक्षुकाला कधीच रिकाम्या हाती जाऊ न देण्याची प्रौढी मनात का होईना मिरवणारे आपण, कधीतरी कोणाच्या दारात उभं राहून काही मागून तर पाहूया. 

स्वत:साठी नको मागूस फार तर. विनोबांनी नाही भूदान मागितलं? विनोबांचं सोड. आपण नाही रे तितके मोठे. पण अहंता बाजूला ठेवून काहीतरी मागणं जमेल आपल्याला? जितक्या सहज, (आणि स्वत:ला शाबासकी देत) आपण दुस-यांच्या डोक्यावर ऋणाची बोचकी ठेवत-ठेवत जातो, तितक्याच साधेपणानं दुस-यांचं काही ऋण आपल्याही माथ्यावर घेणं जमेल? देवीच्या नावाने माग किंवा देशाच्या नावाने, दोन मुठी धान्य माग किंवा हजारो बिघे जमीन. मागून तर पहा. स्वत:पलीकडे जाण्याची, एकतर्फी ऋणाच्या कल्पनेतून मुक्त होण्याची संधी आहे ती.

मागण्याला जर कमीपणाचं समजत असशील तरी प्रसंगानुरूप वाकण्यात, एक पाऊल मागे जाण्यात कमीपणा नाही. शहाणपणा आहे. अन्यथा कोणासमोरही न वाकणा-या सम्राटालाही नतमस्तक व्हायला एखाद्या भिक्षुकाचे पाय हवेत. आणि तशी संस्कृती असणं हे बहुतांशी शहाणपणाचं आहे. सगळ्यांना नाही रे पुरत अंत:स्थ जाणीव नम्रता टिकवायला. मातीचे का होईना, बाहेरचे पाय हवे असतात डोकं टेकवायला. आत बघण्याची वाट ही अशीही जाऊ शकते.

ताठ मानेनं जगण्याची कल्पना धरून असताना, आपल्याला वाकताही यायला हवं. जसं देता यायला हवं तसं मागताही यायला हवं. त्या मागण्यात लाचारी नसावी; देणा-याला घातलेली सच्ची हाक असावी. 

डोळे उघड आणि निसर्गाकडे पाहा. अनेक कडेकपारी, गुहागरुड, द-याखोरी, झाडंपाडं, नदीनाले अंगावर खेळवणारा पर्वत बघ.  आणि नेमाने त्याच्या माथ्यावर बरसणारं आकाश. माझ्या दृष्टीनं दोघंही मोठे. पण बघ तो महाकाय पर्वत किती शांतपणानं, सचैल भिजून घेतोय पावसात. आकाशीचं देणं स्वीकारण्यातलं देखणंपण ह्याच्याकडून शिकावं! डोळे मिटून दाट अरण्यात ध्यानस्थ बसलेला ऋषीच जणू. वीजवारं-पाऊसपाण्याची संततधार आधी आपल्या माथ्यावर घेऊन आपल्या लेकरांना हलकेच न्हाऊमाखू घालणारा बाप. 

त्या डोंगरासारखंच, आकाशातलं ऋण झेलता यायला हवं.. इतकं की आपलं घेणं देखणं होऊन जावं. - मंदार.

Wednesday, February 19, 2014

मी जाता..

"मी नसले, तर कोणाचं किती अडेल..?

म्हणजे, कामावर आहोत आम्ही ८ जण,
तर तिथे एक-अष्टमांश अडेल.

आपल्या दोन्ही घरांत मिळून एक-दशांश अडेल,
मित्रमंडळीत एक-पंचवीसांश,
नातेवाईकांच्या गोतावळ्यात एक-शतांश अडेल.

म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीत एक-दशसहस्रांश..?
आणि ह्या येवढ्या मोठ्या देशा-दुनियेत
शंभरावर कोटीत एक भाग अडेल माझ्याशिवाय."

"तू नसशील, तर माझं सोळा आणे अडेल." 

Thursday, December 05, 2013

प्रतीक्षार्थ

मावळत्या शुक्रामागुन    
मधुरात्र लाजरी येईल
किरणांना खेळायाला 
दंवबिंदू देऊन जाईल

चांदवा - प्रियाचा भास!
बरसेल सखीची प्रीत
हेव्याने धरणी लाविल
चंद्राला काजळतीट

वाळूवर लपलप लाटा
सा-याच खुणा पुसतील
उमटेल पुन्हा आशेने
कधि पाउल संयमशील?

थकलेली पिवळी पाने
गळतील तळ्याच्या काठी
आरक्त-धवल शोकाकुल
प्राजक्त मूक सांगाती

तुज अलगद आठवताना
मन गवतफुलांचे होईल
हुरहूर - मधाचा ठेवा!
त्या फूलपाखरा देईल

"तू अशीच येशिल, येशिल"
गुणगुणता मिटेन डोळे
मम स्वप्न-स्वर्ग-अनुगामी
सोपान दंवाने ओले..


- मंदार.

Sunday, December 01, 2013

कुणी बुद्धी घेता का बुद्धी?

कुणी बुद्धी घेता का बुद्धी?

घ्या ना थोडीतरी, ताई!

मूठभर तुम्हाला देऊ, दादा?

अति झालेल्या अकलेला

गि-हाईक शोधतोय मी.
खूप महागात पडतीये मला..
पडता भाव घेऊन खपवतोय झालं.

आमचे येथे बुद्धी विकणे आहे!

बक्कळ अक्कल, मार्मिक मती,
कवीची कल्पना, अल्पशी प्रज्ञा,
झालंच तर -
तिखट तर्क, वैज्ञानिक जाण,
माणुसकीचं तत्त्वज्ञान,
सगळा माल अहंकार-भेसळमुक्त मिळेल.
(असं नुस्तं लिहायचं असतं, हेही शिकलोय नुकताच!)

अक्कल बाजूला ठेवल्याशिवाय

साधं रोजचं जगता येत नाहीये!

शाळेच्या वर्गात रोज घोकतो ती प्रतिज्ञा

बाहेर आल्यावर सहज विसरता येत नाहीये,
मूल्यशिक्षणाच्या तासाला कानावर पडलेलं
शाळेबाहेरच्या कचराकुंडीत फेकता येत नाहीये,
कॉलेजमधला लोकप्रिय खेळ -
"आधी शिक्षक (चांगलं शिकवणार), 
का आधी विद्यार्थी (नियमित हजेरी लावणार)"
उगाचच माझं डोकं फिरवतोय!

देवळाच्या पायरीवर बसलेल्या भिका-यांकडे दुर्लक्ष करता येत नाहीये,

(जर "देतो, तो देव" असेल, तर ते आत जाऊन
काही मागण्या ऐवजी तुम्हा-आम्हा माणसांना का मागताहेत?)
आडनाव विचारल्याशिवाय देवाची सेवाही करू देत नाहीत, हे
"आपलं तर दर्शन झालं ना घेऊन" असं म्हणून सोडून देता येत नाहीये,
सोन्यानं मढलेल्या सुरेख मूर्ती पाहून
रोज अर्धपोटी झोपणा-या करोडोंना विसरता येत नाहीये,
घरातला कचरा काढून उंब-याबाहेर फेकता येत नाहीये,
आज आपल्याला देवालयांपेक्षा शौचालयांची गरज आहे
हे कोणी म्हणलं तर त्याची टर उडवता येत नाहीये..

जी बुद्धी वापरून विज्ञान शिकलो, इंजिनीयर झालो,

ती बुद्धी फक्त इंजिनियरिंगच्या कामात
आणि पैसे कमवायलाच वापरायची;
पण ते पैसे कसे, कशासाठी वापरायचे
हे ठरवताना मात्र गहाण टाकायची - जमत नाहीये!

रोजच्या बातम्या ऐकवत नाहीयेत,

त्याच त्याच नेत्यांना निवडून देता येत नाहीये,
"अहो, भ्रष्टाचार असायचाच, आपलं ठीक चाललंय ना?"
असं चहाकटिंग मारता मारता म्हणता येत नाहीये,
इतकं काय, "हर फ़िक्र को धुएं में उड़ाना" पण जमत नाहीये!

खरं तर हे इतकं सरळ आहे -

माझं डोकं हे बुद्धी वापरण्यासाठी नाहीच,
नंदीबैलासारखं सगळ्या रूढी-परंपरा-पद्धतींना
"हो, हो" म्हणण्यासाठी आहे!
(आणि हो - पैसे कमवण्यासाठी. त्याचं सोंग नाही आणता येत!)

त्या बुद्धीने कठीण, गहन प्रश्न विचारायचेच नाहीत,

लोक सांगत आले ते ऐकत जायचं, तसंच करत जायचं,
आपल्याला पटो, न पटो... - हे जमतच नाहीये!
.. तुम्ही घेऊन टाकलीत तर नक्की जमेल!

कुणी बुद्धी घेता का बुद्धी?


- मंदार.