Thursday, December 05, 2013

प्रतीक्षार्थ

मावळत्या शुक्रामागुन    
मधुरात्र लाजरी येईल
किरणांना खेळायाला 
दंवबिंदू देऊन जाईल

चांदवा - प्रियाचा भास!
बरसेल सखीची प्रीत
हेव्याने धरणी लाविल
चंद्राला काजळतीट

वाळूवर लपलप लाटा
सा-याच खुणा पुसतील
उमटेल पुन्हा आशेने
कधि पाउल संयमशील?

थकलेली पिवळी पाने
गळतील तळ्याच्या काठी
आरक्त-धवल शोकाकुल
प्राजक्त मूक सांगाती

तुज अलगद आठवताना
मन गवतफुलांचे होईल
हुरहूर - मधाचा ठेवा!
त्या फूलपाखरा देईल

"तू अशीच येशिल, येशिल"
गुणगुणता मिटेन डोळे
मम स्वप्न-स्वर्ग-अनुगामी
सोपान दंवाने ओले..


- मंदार.

Sunday, December 01, 2013

कुणी बुद्धी घेता का बुद्धी?

कुणी बुद्धी घेता का बुद्धी?

घ्या ना थोडीतरी, ताई!

मूठभर तुम्हाला देऊ, दादा?

अति झालेल्या अकलेला

गि-हाईक शोधतोय मी.
खूप महागात पडतीये मला..
पडता भाव घेऊन खपवतोय झालं.

आमचे येथे बुद्धी विकणे आहे!

बक्कळ अक्कल, मार्मिक मती,
कवीची कल्पना, अल्पशी प्रज्ञा,
झालंच तर -
तिखट तर्क, वैज्ञानिक जाण,
माणुसकीचं तत्त्वज्ञान,
सगळा माल अहंकार-भेसळमुक्त मिळेल.
(असं नुस्तं लिहायचं असतं, हेही शिकलोय नुकताच!)

अक्कल बाजूला ठेवल्याशिवाय

साधं रोजचं जगता येत नाहीये!

शाळेच्या वर्गात रोज घोकतो ती प्रतिज्ञा

बाहेर आल्यावर सहज विसरता येत नाहीये,
मूल्यशिक्षणाच्या तासाला कानावर पडलेलं
शाळेबाहेरच्या कचराकुंडीत फेकता येत नाहीये,
कॉलेजमधला लोकप्रिय खेळ -
"आधी शिक्षक (चांगलं शिकवणार), 
का आधी विद्यार्थी (नियमित हजेरी लावणार)"
उगाचच माझं डोकं फिरवतोय!

देवळाच्या पायरीवर बसलेल्या भिका-यांकडे दुर्लक्ष करता येत नाहीये,

(जर "देतो, तो देव" असेल, तर ते आत जाऊन
काही मागण्या ऐवजी तुम्हा-आम्हा माणसांना का मागताहेत?)
आडनाव विचारल्याशिवाय देवाची सेवाही करू देत नाहीत, हे
"आपलं तर दर्शन झालं ना घेऊन" असं म्हणून सोडून देता येत नाहीये,
सोन्यानं मढलेल्या सुरेख मूर्ती पाहून
रोज अर्धपोटी झोपणा-या करोडोंना विसरता येत नाहीये,
घरातला कचरा काढून उंब-याबाहेर फेकता येत नाहीये,
आज आपल्याला देवालयांपेक्षा शौचालयांची गरज आहे
हे कोणी म्हणलं तर त्याची टर उडवता येत नाहीये..

जी बुद्धी वापरून विज्ञान शिकलो, इंजिनीयर झालो,

ती बुद्धी फक्त इंजिनियरिंगच्या कामात
आणि पैसे कमवायलाच वापरायची;
पण ते पैसे कसे, कशासाठी वापरायचे
हे ठरवताना मात्र गहाण टाकायची - जमत नाहीये!

रोजच्या बातम्या ऐकवत नाहीयेत,

त्याच त्याच नेत्यांना निवडून देता येत नाहीये,
"अहो, भ्रष्टाचार असायचाच, आपलं ठीक चाललंय ना?"
असं चहाकटिंग मारता मारता म्हणता येत नाहीये,
इतकं काय, "हर फ़िक्र को धुएं में उड़ाना" पण जमत नाहीये!

खरं तर हे इतकं सरळ आहे -

माझं डोकं हे बुद्धी वापरण्यासाठी नाहीच,
नंदीबैलासारखं सगळ्या रूढी-परंपरा-पद्धतींना
"हो, हो" म्हणण्यासाठी आहे!
(आणि हो - पैसे कमवण्यासाठी. त्याचं सोंग नाही आणता येत!)

त्या बुद्धीने कठीण, गहन प्रश्न विचारायचेच नाहीत,

लोक सांगत आले ते ऐकत जायचं, तसंच करत जायचं,
आपल्याला पटो, न पटो... - हे जमतच नाहीये!
.. तुम्ही घेऊन टाकलीत तर नक्की जमेल!

कुणी बुद्धी घेता का बुद्धी?


- मंदार.