Saturday, November 06, 2010

कृष्णछाया

दीस मावळला आता त्यात हरवली वाट
शोधे देवकीचा देव कान्ह्यासाठी एक घाट

दीस निवळला आता त्यात हरवली जाग
राख गोकुळाच्या मनी, आग उद्धवाचा राग

दीस झाकोळला आता त्यात हरवली राधा
सावळ्याच्या आठवांची वेडीखुळी भूतबाधा

दीस गढूळला आता त्यात हरवले रान
श्याम कात-चुन्याविना मीरा काजळले पान

दीस आकळला आता त्यात हरवली आस
होतो अर्जुनाच्या मनी कर्तेपणाचा निरास


मंदार.