Tuesday, March 29, 2011

...

सखि मावळला पश्चिमरेषेपाशी,
चंद्रमा स्तब्ध आकाशी
बघ विसावला अस्ताचलमाथ्याशी,
मध सांडुन उंबरठ्याशी
वाळुन गेल्या निशिगंधाच्या राशी,
उललेल्या ओष्ठकळ्यांशी

सोडून उद्याची भ्रांत,
ये नीज अशी गं शांत,
तू रातराणी रतिक्लांत -

ही मालवतो आता ज्योत उशाची,
थरथरती रात्रभराची
तू मिटून घे जादू दो नयनांची,
भिरभिरत्या सुमपंखांची
गं शपथ तुला भिजलेल्या गालांची,
दंवभरल्या गवतफुलांची

होते अरुणाची नांदी
संपला खेळ स्वच्छंदी
ओसरे तमाची धुंदी -

मी आठवतो सरल्या संध्याकाळी,
घन उतरे गौर कपाळी
मन बैरागी फिरते रानोमाळी
पाखरू फुलांच्या गाली
सखि झोपी जा शांत चंपकाखाली,
ओढून मृदेची लाली


- मंदार.

Thursday, February 24, 2011

होडी.

तीती, तोतो, तोतींनो,

पोटात वाटलं तर; वाटलं की -
घ्या एक कागद.
लिहा त्यावर मोकळं, उमदं काही,
मोत्यांच्या अक्षरांत.

शंका-तक्रारींना थांबवा दाराबाहेर.
खिडक्या मात्र उघड्याच ठेवा -
अकस्माताच्या गाठींसाठी.

अलगूज रानधून गुणगुणत
उधळा त्या कागदावर
विश्वासाचे शाश्वत रंग.
खोट्या आशांचा मुलामा टाळून.
आकार, नक्षीची काळजी सोडून.

हलक्या हलक्या घड्या घालत
करा एक होडी त्याची.
उचला सांभाळून,
नावडलेले कोपरे न मुडपता,
अन् द्या सोडून अलगद.

पावसाशी दंगा करत
होडी पुढे जाताना,
खूप पावसाळ्यांपूर्वीचा
तो खेळ आठवेल ना?


- मंदार.