Tuesday, November 02, 2021

रंग माझा वेगळा - सुरेश भट

रंगुनी रंगात सा-या रंग माझा वेगळा, 

गुंतुनी गुंत्यात सा-या पाय माझा मोकळा


सुरेश भटांचं आयुष्य वादळी होतं. मला वाटतं हे गीत त्यांनी बरंचसं स्वत:च्या अनुभवांवर लिहिलं आहे. 

आयुष्यातले उतार-चढाव बहुतेकांच्या नशिबी असतातच. पण सामान्यांच्या मानाने भटांच्या वाट्याला आलेले अनुभव अतिशय खडतर होते. पायाला पोलियो, शालेय जीवनातलं अपयश, त्यामुळे घरात आणि बाहेर दुय्यम वागणूक आणि उपेक्षा, आणि कालांतराने स्वत:ला काही अंशी सिद्ध करून देखील वाट्याला आलेली परकेपणाची भावना. 

ह्या सगळ्यातून भटांसारखा कलंदर माणूस उत्कटतेनं जगत राहतो. अडचणी-दु:ख हे सहन करत असतानाही ते एक आपला वेगळा ठसा उमटवतात, आपला असा एक विलक्षण परीघ निर्माण करतात, आणि तो उत्तरोत्तर वाढवत नेतात. हे गीत म्हणजे या प्रवासाची कहाणी आहे. 

रंगुनी रंगात सा-या रंग माझा वेगळा, 

गुंतुनी गुंत्यात सा-या पाय माझा मोकळा

वाट्याला आलेली सुखं-दु:खं भोगताना आपला एक वेगळा रंग-ढंग आकार घेत जातो. प्राक्तन कोणाला चुकत नाही, पण भटांसारखे कलंदर ह्या जगरहाटीत गुंतूनही निराळीच उंची गाठतात.


भोग जे येती कपाळी ते सुखाने भोगतो;

अन्‌ कळ्या झाल्या कधीच्या सोशिल्या ज्याच्या कळा !

ह्या सोसलेल्या कळांच्या कळ्या-फुलं करण्याचा कलंदरपणा भटांसारख्यांकडेच असतो. भोवताली कितीही विदारक परिस्थिती असेल तरी आपल्या आतल्या प्रेरणेने काही लोक त्या चिखलातही कमळं फुलवतात. (ह्याची पराकोटीची साक्ष देतात ज्ञानेश्वरांनी आपल्या पाठीवर भाजलेले मांडे, किंवा Victor Frankl सारख्यांचे नाझी छळछावणीतले अनुभव.)  आणि ह्यातून जात असताना फार थोड्या लोकांना भटांची खरी ओळख पटली आहे. एके ठिकाणी त्यांनी लिहिलंय, "जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला, मी इथे हे अमृताचे रोपटे रूजवून गेलो..!"


राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी

हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा !

दु:ख सुद्धा पूर्ण झोकून देऊन भोगता येतं. त्या वेळच्या अश्रूंची झालेली गाणी भटांची साथ करत राहतात. नेहेमी त्यांच्या ओठांवर येत राहतात. इथे पुन्हा पुन्हा वाट्याला येणारी काही एक प्रकारची दु:खं भट सांगतायत - जी त्यांच्या आसपास घोटाळत राहतात - जणू त्यांना भटांचा लळा लागलाय!  भटांचाच एक शेर आहे -  "प्राण जाताना दग्याचा मी कुठे आरोप केला ? ओळखीच्या माणसांचे ओळखीचे घाव होते.."  हे असे ओळखीचेच घाव पचवत भट पुढे जात राहतात.


कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो

अन्‌ कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ?

अन्याय, अवहेलना, उपेक्षा सहन करत करत भट स्वत:ला सावरू बघतात. पण हे करत असताना बाकीच्यांच्या वाटेला येणारं साधं आयुष्य, त्यातल्या लहान पण सोनेरी क्षणांना ते पारखे राहून जातात. 


सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा :

"चालणारा पांगळा अन्‌ पाहणारा आंधळा !"

ह्या प्रवासाच्या एका टप्प्यावर स्वत:ला नुसतं सावरूनच नाही, तर फुलवून भट प्रस्थापित होतात. एक उदाहरण म्हणजे बीएला दोनदा नापास झालेल्या सुरेश भटांचा ‘रंग माझा वेगळा’ हा काव्यसंग्रह एम.ए.साठी अभ्यासक्रमात क्रमिक पुस्तक म्हणून ठेवला जातो. पण हे होत असतानाही, स्वत:चे काही कर्तृत्व नसणा-यांनी (खोट्या मार्गदर्शकांनी) त्यांची उपेक्षाच केली. भटांच्या आयुष्याला एखाद-दोन विशेषणांत बंदिस्त करून त्यांच्या कामगिरीला छेद देण्याचा, कमी लेखण्याचा प्रयत्न झाला.. 


माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :

माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !


इथे शेवटच्या शेरात भट प्रखरपणाने प्रकट होतात. हा सगळा प्रवास हा फक्त सुरेश भट ह्या व्यक्तीच्या संघर्षाचा नसून, त्यांच्या कलंदर जगण्याने प्रेरित होणा-या अनेकांचा आहे. जेव्हा सगळीकडे अनीती पसरली आहे, दिलदारपणा संपला आहे, एकमेकांनी फक्त खाली ओढण्याचा खेळ चालला आहे, अश्या माणसांनी स्वत:च निर्माण केलेल्या मध्यरात्री, भटांसारखा एक कलंदर सूर्यासारखा हिंडतो आहे. आपल्या परिघातला अंधार निपटून टाकतो आहे. आपल्यासारखे उत्कट जगणारे कोणी शोधतो आहे. अश्या पेटून जगणा-यांबद्दल भटांनी लिहिलंय - "जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा, विजा घेऊन येणा-या पिढ्यांशी बोलतो आम्ही!"


भटसाहेबांसारखा गीतकार-गज़लकार पुन्हा होणं नाही.. त्यांच्या प्रतिभेला आणि जीवनदृष्टीला नकळत हात जोडले जातात! 

Friday, August 27, 2021

आहेस कुठे तू?


डाव अर्धा राहून गेला, आहेस कुठे तू?
चहा थंड होऊन गेला, आहेस कुठे तू?

काडी तुझी, विडी माझी पेटत होती
मस्कापाव वाळून गेला, आहेस कुठे तू?

गाडी माझी, पेट्रोल तू भरणार होतास
गोवा प्लॅन राहून गेला, आहेस कुठे तू?

तुझ्या शकील साहिरचा मी तलत रफ़ी
तप्त स्वर विरून गेला, आहेस कुठे तू?

भेगांमधून हिरवे कोंब फुटू पाहत होते
'अमलताश' गळून गेला, आहेस कुठे तू? 


- मंदार.

कातरवेळ


परवा म्हणालास सरतंय वय, तसा संथ होतो आहेस
.. समुद्राकडे निघालेल्या नदीसारखा संथ हो
परवा म्हणालास सरतंय वय, तसा आवाज कापतो आहे
.. कातरवेळी समईपुढला भावभरला कंठ हो

परवा म्हणालास सरतंय वय, डोळ्यांत चट्कन पाणी येतं
.. तापलेल्या जमिनीसाठी गर्द निळा मेघ हो
परवा म्हणालास सरतंय वय, तसं लक्षात राहात नाही
.. संध्याकाळी आभाळावर बगळ्यांची रेघ हो

परवा म्हणालास सरतंय वय, दिसत नाही नीटसं काही
.. धुक्यामध्ये हरवलेली टेकडीवरची वाट हो
परवा म्हणालास सरतंय वय, उगाच गळा दाटून येतो​
.. पाऊलखुणा कुरवाळणारी वाळूवरची लाट हो

परवा म्हणालास सरतंय वय, तसा इवला होतो जीव
.. सुरकुतलेल्या हातांमधली मऊशार वीण हो
परवा म्हणालास सरतंय वय, पडदा पडेल खेळावर
.. मनात वाजत राहणारी आठवांची बीन हो


- मंदार.

Saturday, August 07, 2021

दिवे लागले रे..

दिवे लागले रे .. पं. अभिषेकींनी संगीत दिलेली आणि गायलेली शंकरबाब रामाणींची ही रचना खूप खोलवर हलवून गेली..


दिवे लागले रे, दिवे लागले रे, तमाच्या तळाशी दिवे लागले रे 
दिठीच्या दिशा खोल तेजाळताना, कुणी जागले रे कुणी जागले ..

रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी, असे झाड पैलाड पान्हावले 
जिथे मोकळा मी मला हुंगिताना, उरी गंध कल्लोळुनी फाकले 

उभ्या रोम-रोमातुनी चैत्रवाटा, कुणी देहयात्रेत या गुंतले..!
आरक्त त्याच्या कृपेच्या कडा अन् उष:सूक्त ओठात ओथंबले

शंकर रामाणींनी त्यांची पत्नी मृत्युशय्येवर असताना ह्या ओळी लिहिल्या आहेत. तिच्या आयुष्याची अखेर समोर उभी असताना एका विलक्षण, विचित्र मानसिक अवस्थेत शंकर बाब सापडले, आणि त्यातून हे गीत बाहेर पडलं. 

बहुतेक काव्यामध्ये ’दिवे लागणे, तेजाळणे’ हे शुभ, आनंददायक प्रतीक म्हणून वापरलं जातं. पण हे गीत त्या अर्थाने साधं-सरळ इहलोकातलं आनंदगान नाही. आयुष्याच्या संध्याकाळी, परलोकाच्या उंबरठ्यावर उभ्या असणार्‍या एका योग्याचं मनोगत आहे हे. किंबहुना विचारी माणूस मृत्यू समोर असला की असा योग्याच्या भूमिकेत जातो, आणि अनेक गहन विचार त्याच्या मनात उचंबळून येतात. एका बाजूला, इहलोक आणि इथलं सगळं प्रिय ते सोडण्याची वेळ जवळ आलेली असते, आणि दुस-या बाजूला व्यक्तीचा आत्मा शरीराचा हा पिंजरा सोडायला उत्सुक असतो. त्या आत्म्याच्या दृष्टीने मृत्यू हा सरळसरळ दु:खदायक प्रसंग नसून, जगण्याच्या पुढचं नैसर्गिक पाऊल आहे. देशाटन करणा-या प्रवाश्याने जसा सहजपणे एका प्रदेशाचा निरोप घेऊन नदीपार दुस-या प्रदेशाकडे नावेतून जावं, तसं ह्या आत्म्याचं आहे ते शरीर गळून पडणार आहे, आणि तो पुढच्या प्रवासाला जायला मोकळा आहे. ग्रीक पुराणांमधली ’Styx' नदी ही अशीच इहलोक आणि परलोकाच्या सीमेवरची नदी आहे. 

दिवे लागले रे, दिवे लागले रे, तमाच्या तळाशी दिवे लागले 
दिठीच्या दिशा खोल तेजाळताना, कुणी जागले रे, कुणी जागले..

रामाणींनी ’तमाच्या तळाशी दिवे लागले’ असं म्हटलंय. इहलोक सोडण्याच्या क्षणी, मृत्यू समोर असताना, अंधाराने भरून गेलेल्या आयुष्यातला शेवटचा किरण त्या मुक्तीच्या दिव्याचा आहे. हा दिवा त्या अंधाराचा समूळ नाश करणारा आहे - त्यामुळेच तो खोल तळाशी आहे. मनुष्याचे आतले डोळे आता त्या दिव्याकडेच लागले आहेत, आणि एक निराळीच जाग आली आहे. ही जाग आत्म्याच्या पातळीवरची आहे, ज्याची पुसटशी ओळख आता होऊ लागली आहे. कुणी जागले रे .. 

रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी, असे झाड पैलाड पान्हावले 
जिथे मोकळा मी मला हुंगिताना, उरी गंध कल्लोळुनी फाकले 

मृत्यूच्या समीप, ह्या विचारी माणसाने इहलोकातलं सगळं अर्पण करून टाकलं आहे, त्यागलं आहे. हे मृत्युकाळी येणारं वैराग्य सांगणा-या संत तुकारामांच्या ओळी आहेत - "वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नि लागला ब्रह्मत्वेसी". आता मानवाची ओंजळ परलोकातलं दान स्वीकारण्यासाठी मोकळी आहे. आणि पैलतीरावरचं ते झाड ह्या ओंजळीत फुलांचा वर्षाव करणार आहे.   हा एक उंबरठा ओलांडून गेल्यावर आलेलं हलकेपण रामाणींनी गंधभाषेतून सांगितलंय. आपल्या पाच जाणिवांमध्ये वासाची, गंधाची जाणीव ही सर्वात जास्त तरल, पण दीर्घकाळ सोबत करणारी आहे. त्याचा दाखला देऊन रामाणी सुचवतायत की जणू आत्मा आता स्वत:ला परत ओळखू लागलाय, आणि आपलीच खूण पटल्याचा एक निराळाच आनंद-कल्लोळ दाटलाय.. 

उभ्या रोम-रोमातुनी चैत्रवाटा; कुणी देहयात्रेत या गुंतले..!
आरक्त त्याच्या कृपेच्या कडा अन् उष:सूक्त ओठात ओथंबले

शरीर सोडून आत्मा पुढच्या प्रवासाला निघाला.. आता पैलतीरावरची हाक ऐकू येतेय. एक नवी रोमांचक सुरुवात, चैत्र महिन्याची आठवण करून देणारी. आता जो देहयात्रेत गुंतला होता तो शारीरभाव मागे पडला, अनोळखी वाटायला लागला. परत तुकोबांची ओवी आठवते - "तुका म्हणे रक्षा जाली आपोआप । उजळला दीप गुरूकृपा"! आता दृष्टी पुढे स्थिर झाली - सूर्योदयाच्या अगदी सुरुवातीला लालिमा पसरतो तश्या कृपेने आश्वस्त होऊन ह्या नव्या पहाटेचं गीत दाटून आलं. 


शंकर रामाणींच्या ह्या गहनगंभीर रचनेला पं. अभिषेकींनी साजेसं संगीत दिलंय आणि त्यांच्याच आवाजाने अमर केलंय. गोव्याच्या ह्या दोन महान कलाकारांनी दिलेलं परलोकीचं देणंच. 

- मंदार.