Friday, December 12, 2025

श्वासांमधलं अंतर तू!

श्वासांमधलं अंतर तू
चांदणगच्च अंबर तू

युगायुगांची तहान मी
कातळांतला पाझर तू

संध्याकाळी कातर मी
ज्योती ज्योती सावर तू

महाभारता कारण मी
पार्थाचा योगेश्वर तू

चिंता, शंका, संभ्रम मी
त्या साऱ्यांचं उत्तर तू 


- मंदार.

Monday, October 06, 2025

तू !

आम्ही फुलं रानातली, राजवाड्यातलं कमळ तू
आमची मैत्री बाभळीशी, कल्पवृक्षाजवळ तू !

माळावरचा हरी आता देवळामध्ये गजाआड
बाळकृष्ण तुझ्यापाशी, नंदाघरचं उखळ तू !

शिव्याशाप आमच्या कानी, काट्यांतून काढतो वाट
नीळकंठ होऊन कसा पचवतोस गरळ तू ?

आम्ही लहान खेडेगाव चंद्रमौळी झोपड्यांचं,
कुबेराच्या चांदण्यात झगमगणारं परळ तू ! 

सारवट गाडीखालची आम्ही ओबडधोबड पाऊलवाट
सुखाकडून सुखाकडे राजरस्ता सरळ तू

अवसेच्या या रात्री पुरती ज्योत आमची सावरतो
भयाण अंधारातून आता पहाट होऊन उजळ तू

सेतूसाठी वाळू आमची, द्रोणागिरी उचल तू
गोवर्धनातळी आमच्या, एकीतून उमल तू 

 - मंदार.