Saturday, February 13, 2010

ओंडके



जा, तू जा सखी माघारी.
नको आज गळामिठी, नकोच आज गाठभेट.
उद्या, परवा, तेरवाही नकोच.
जाऊ दे थोडे दिवस, सरू दे थोडे महिने.
वेडाबाई, रोजच तर भेटतेस!
.. निदान तुझी आठवण तरी येऊ देशील का नाही?

नकोच. रोज नको दिसू तशी,
रोज नको सापडू अशी.
चंद्र-सूर्य संध्याकाळ, शब्द-सूर रानफुलं -
कशातच शोधलं नाही तुला, किती दिवसात.

गर्दीत मिसळून जाऊ दोघं.
भरकटू दूर, दूर तिरपांगड्या दिशा निवडून.
थोडी जा दृष्टीआड, थोडी हाकेच्या पलीकडे.

जरा बघू एकटंच चालून. पाहू वेगात धावून.
खाऊ चार धक्के एकटेच, देऊही दोन लावून.
ठरवून हरवून जाऊ, असं म्हण फार तर.

डोंगरद-यात हिंडताना
रानफुलांचा चुकार वास छाती भरभरून घेताना,
रात्री उघड्यावर पहुडल्यावर
चांदण्याचा स्पर्श होताना,
झ-याच्या अलिप्त खळखळीबरोबर
सुरेल तान छेडताना
जेव्हा तू कडकडून आठवशील,
जेव्हा तुझा गंध-सूर-स्पर्श यांनी
आणि यांनीच
माझा जीवताप शमेलसा वाटेल
तेव्हा निघेन परत यायला.

आणि तूही गेली असशील
सातासमुद्रापार निघून,
उडवला असशील घोडा चौफेर,
घातले असशील मातीत हात
आणि फुलवले असशील मोती.
दाणेदार अक्षरात गोंदले असशील
तुझे हळुवार चांदणबोल.
जेव्हा - आणि जर! -
तुला त्या मातीत
माझा रापलेला चेहरा पुन्हा दिसेल,
त्या शब्दांत माझा सूर ऐकू येईल,
आणि माझी कडकडून आठवण होईल,
तेव्हा - आणि तरच -
नीघ परत यायला.

पण परतीची वाट
जरा भरभर चालशील ना?


- मंदार.

7 comments:

Saee said...

surekh!!

Milind Gadre said...

"कशातच शोधलं नाही तुला, किती दिवसात."

he faar bhaari ahe are!!!

Ati sundar!

हेरंब said...

अप्रतिम..

Mandar Gadre said...

@ सगळे: धन्यवाद! :)

Shashank Kanade said...

केवळ अशक्य!
खूप आवडला भाव कवितेचा. अन्‌ गुंफणही सुरेख साधलियेस.

Mandar Gadre said...

धन्यवाद, शशांक! :)

darshanaw said...

..अप्रतिम ....खूप भावल ...असच...छान लिहित जा