फार प्रेमळ आहे ती.
हक्कानं जिच्याकडून लाड करून घ्यावेत अशी.
खट्टी-मीठी.
दिवसभर तोंडात धरली
तरी हव्याश्या वाटणा-या चिंचेसारखी लाघवी.
उगाच नुसत्या मिट्ट गोड साखरेसारखी नाही.
तिच्या नात्यांकडे पाहिलं तर
पोटातली माया समजते हळू-हळू.
कुरळे अल्लड केस एकत्र घेऊन
एक सुरेख वेणी घालावी, तशी
एकमेकांत गुंफलीयेत तिची सगळी नाती.
आहेत मोजकीच, पण अगदी घट्ट.
एकाच डोंगरातून उड्या मारत येणारे झरे
एकत्र येऊन नदी साजरी करतात तसंच.
तो?
वेडाय फक्त.
मनास आल्याशिवाय काहीच नाही करणार कधीच.
आणि तसं वागण्याचे जे काही भोग असतील
ते आनंदात भोगणार.
पश्चात्ताप वगैरे गोष्टींना मनात जागाच नाही.
सारख्या काही ना काही केलेल्या धडपडींचं बक्षीस
म्हणून खरचटणं ठरलेलंच.
ते उगाच लपवणार नाही
आणि दाखवत फिरणारही नाही.
मनात जपून मात्र ठेवणार!
त्याची सगळी नाती म्हणजे मनसोक्त भटकणा-या,
कधी मनात आलं तरच एकमेकींना चेहरा दाखवणा-या
डोंगरातल्या चुकार पायवाटा.
वैरिणी नसतील, पण सोय-याही नाहीत.
एकाच मनगटातून निघणारी
पण बाकी काहीच साम्य नसलेली पाच बोटं.
एकदा ते दोघं भेटले.
आणि मग भेटतच राहिले.
पुढे कधीतरी त्याची नातीही भेटली एकमेकांना,
तेव्हा त्याच्या लक्षात आलं -
समुद्राशी भेट जवळ आल्यावर
नदीला फाटे फुटतात
तेवढीच काय ती लांब होती एकमेकांपासून.
आणि त्याच्याच आतून आलेली ती सगळी,
एकदा समुद्रात मिसळून गेल्यावर
वेगळी का करता येणार होती?
नाती त्याची होती,
समुद्र तिचा.
- मंदार.
Wednesday, July 21, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
9 comments:
khoop sundar. :)
This style of writing is much more relaxed. It seems like taking the burden of rhyme off has made you concentrate more on what you want to say.
Bravo!
Can't agree more with Saee :) too good!
@सई, सुमेधा: खूप धन्यवाद :)
किती सुरेख लिहिलंयस रे! नात्यांचं ते अख्खं चित्र फार सुंदर आहे. धन्यवाद!
very nice..
stellar !!!
मी कसं नव्हतं रे वाचलेलं हे अद्याप? :(
मी म्हटलं होतं नं तुला की तू भोगतोस म्हणून तुला भिडतं, आणि ते भिडतं म्हणून तुला इतरांपेक्षा जास्त नेमक्या नाही म्हणता येणार पण intricate रितीने कळतं-ते नेमकं का आणि कसं- हे कळलं. किंवा ऍटलीस्ट कळल्यासारखं वाटतंय.
आपण एखाद्या गोष्टीच्या नेमक्या प्रतवारया नाही ठरवू शकणार कदाचित किंवा नेमक्या अलवार उलगडून नाही दाखवू शकणार, पण हे असलं ’देहावरची आंधळी त्वचा छिलून घ्यावी कोणी’ करत करत आपला त्या दिशेने प्रामाणिक अटेंप्ट तर देऊ शकतो.
तुझा प्रयत्न भिडला. लिहीत रहा असलं काहीतरी. कठीण असतं असं खूप आतआत पर्यंत खरवडून लिहीलेलं पुन्हा पुन्हा लिहीणं- पण तरीही.
@ गायत्री, योग - धन्यवाद :)
@Nil: धन्यवाद :)
@श्रद्धा: नक्कीच लिहीत राहीन. भेटत राहूच.
Post a Comment