Tuesday, July 29, 2008

ऋण-भार

उपकार-फेड सौदा परक्यांत होत आहे
मित्रांस स्निग्धतेचा का भार होत आहे?

जरि पांघरूण त्याला उबदार घातले मी
ओझेच त्या उबेचे सखयास होत आहे

धरणीस पावसाचा भालास कुंकुमाचा
कुसुमांस गुंजनाचा का जाच होत आहे?

’माझा’ म्हणून केले, प्रेमार्द्र अंतराने
ऋणभार-क्लेश माझ्या हृदयास होत आहे

वाटे, ऋणे असावी ऐशी मधाळलेली
मधुमास आपुला का वैशाख होत आहे?


मंदार.

6 comments:

Milind Gadre said...

सुंदर !!!

prasad bokil said...

अरे बरेच दिवस तू काहीच लिहीत नव्हतास. पुन्हा लिहायला सुरुवात केलीस हे छान केलेस. कविता छान आहे. दुसर्या कडव्यामधे "पण" च्या जागी एखादा एकाक्षरी शब्द आलातर लयीमधे छान बसेल असे मला वाटते. उदा...
"मी पांघरूण त्याला उबदार घातले जे
ओझेच त्या उबेचे सखयास होत आहे"

Mandar Gadre said...

धन्यवाद, मिलिंद आणि प्रसाद!

@ प्रसाद:
वृत्ताच्या दृष्टीने, "जे" हा एकाक्षरी असला तरी ’लघु’ नसून ’गुरू’च आहे - "पण" सारखाच. त्यामुळे लयीत फरक नाही पडणार.
शिवाय, तो "पण" तिथे अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, बरोबर?

prasad bokil said...

तुझे अगदी बरोबर आहे. प्रत्येक ओळीत २४ मात्रा आहेत. १२ मात्रांनंतर यती येत आहे म्हणजे हे समजाती मात्रावृत्त आहे. तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे. परंतु जेव्हा कविता म्हणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा प्रत्येक यतीपाशी आपण थांबतो (म्हणूनच त्याला यती म्हणतात) त्या अक्षराशी उच्चार गुरू होतो. "पण" मधे दोन्ही लघू उच्चार लयीतील वजन गमावून बसतात. आणि जर "ण" पाशी यती घेतली तर मात्रांची गडबड होते. हा "पण" सोडल्यास बाकी सर्व यतींपाशी गुरू मात्रा येत आहेत.
मी काही यातला तद्न्य नाही. पण तरी पण पुणेकर असल्याने आपले मत नोंदवतो.

Mandar Gadre said...

:-) पटतंय तुझं.
अर्थात, मराठी बोलताना आपण "पण" चा उच्चार "पण्" असा करतो (निदान मी तसंच म्हणून पाहिलं होतं मनात, तो शब्द लिहिताना), त्यामुळे कदाचित मला एवढं विचित्र नसेल वाटलं.
(संस्कृतमध्ये त्या "पण" चा उच्चार पूर्ण "पण" असा केला गेला असता.)

आणि हो, तू पक्का पुणेकर "तज्ज्ञ" वाटतो आहेस!

Harshada Vinaya said...

khup suder gajhal !!