Saturday, January 16, 2010

आर्तव

गं,

आज निवांत बसलोय अंगणात. तू करायचीस तसा वाफाळता दुधाचा चहा घेऊन. तुझ्या लाडक्या - आपल्या लाडक्या - मातीच्या लेकरांकडे बघत.

किती वेडीयेत ती! दर वर्षी हाच खेळ खेळायचा.. उन्हाळा सरला की असंख्य रंगांत पानं रंगवून आरास मांडायची. ती पाहून आम्ही ठार वेडे होणार. मातीबाईंच्या शाळेत रोज एकसारखा हिरवा गणवेश घालून जाणारी ही पोरं शरदाच्या त्या स्नेहसंमेलनात ओळखूही येत नाहीत. आपल्याच गल्लीतल्या ह्या नेहमीच्या दोस्तांचे चेहरे अवेळीच आलेल्या रंगपंचमीला किती निराळेच दिसतात! असं मनसोक्त खेळून झालं आणि हिवाळा जवळ आला की मग अल्लद ते रंग काढून ठेवायचे.. हुडहुडी भरायला लागली, की पानांची अंगडी-टोपडी आईकडे सोपवायची आणि थंडी उघड्या अंगानं, बोडक्या माथ्यानं काढायची - कुठून सुचतं हे?

मग सावकाश वसंताची चाहूल लागली की नव्या नवरीसारखं नटायचं, नव्या भिडूबरोबर भातुकली मांडायची. ती सजवायला हजारानी फुलं फुलवायची. त्यांच्यावर ती फुलांचं नाव सांगणारी पाखरं येणार, वेडे भुंगे घोंघावणार, मधचोख्या पक्षी भिरभिरणार.. त्यात कधी पाकळ्या गळणार, कुठल्या कळ्या कोमेजणार, पानं चुरगळणार, देठं मुडपणार.. पण खुळ्या फुलांना त्याचं काही नाही. उलट ती वेडी या सगळ्यांबरोबर नाचणार, नाचणार..

मग वा-याचा हात धरून तारुण्याचं गूज एकमेकांना सांगणार आणि तशातच एक दिवस त्यांची रसरशीत फळं होणार. दूरदेशातले कोणसेसे पक्षी येऊन त्यांवर ताव मारणार. कधीमधी त्यांच्या चोचींतून, पोटांमधून टणटणीत बिया कुठेकुठे जाऊन पडणार. मग उन्हाळ्यात जमीन खरपूस भाजून निघणार, त्यात त्या ताडताड तडकणार. आता त्यातल्या कितीतरी तडकतच नसतील, नुसत्या मातीमोल पडून राहात असतील - पण असल्या शंका त्यांना सतावत नसाव्यात.


मुळातच इवलं-इवलं मोजून काही करणं त्यांना पसंत नसावं. वाया जाणं, पडून राहणं, मातीमोल होणं - हे ही आम्हा गरिबांच्याच डोक्यातलं. एकामागून एक येत जाणा-या ह्या ऋतुचक्राचा कुठलाही कंटाळा येत नाही त्यांना. सगळं कसं नेमून दिल्याप्रमाणे चालू. गुदस्त सालासारखं ह्या साली. आखून दिल्यासारखं असलं तरी किती मनस्वी दिसतं सगळं.. मदमस्त वा-याबरोबर मोकाट खेळणा-या ढगांसारखं. (उगाच नाही गुरुदेवांनी म्हटलंय - पाखरं आणि ढग एकमेकांचा हेवा करतात म्हणून!) खळखळवेड वाहण्या-या झ-यालाही भौतिकीचे नियम असतातच की. म्हणावं तर बांधलेले आहेत हे सगळे, म्हणावं तर नाहीत. ती आखणी, ते नियम त्यांच्या पायांच्या बेड्या नाही होऊ शकत, पैंजणं होऊन जातात.

आणि ही झाडं-फुलं-फळं त्या सगळ्या भरडत्रासातून कशी विनातक्रार जातात! उन्हाच्या झळा झेलायच्या, गारठलेल्या अंगांनी थंडी काढायची, नव्या पालवीच्या वसंतवेणा सोसायच्या.. चक्रमेनिक्रमेण जगणं चालू. सगळ्याभर पसरलेल्या विराट विश्वाशी कसं घट्ट नातं आहे ना त्यांचं - गोल गोल फिरणारा कालसर्प, तसंच गोलाकार जगत जाणारी ही सगळी..

तुझ्यासारखीला त्यांचं हे जगणं इतकं सहज आणि उत्कटपणे समजत होतं, ह्यात काहीच नवल नाही वाटत आता. ही झाडं जशी त्यांच्या अंगाखांद्यांवर आवर्तकारी विश्वाचं छोटं रूप खेळवतात, तशीच तू - अक्षरश: स्वत:च्या आत वर्षानुवर्षं आर्तवचक्र वागवणारी. निसर्गाची चक्रीयता तुला मुद्दाम वेगळी थोडीच समजावून घ्यायला लागणार होती? कसं वाटायचं गं? नव्या जिवाला जन्म द्यायची शक्ती आपल्याच आत आहे हे पुरेपूर उमजल्यावर? हातांनी काहीबाही अचेतन वस्तू बनवायचा आनंद तेवढा मला माहीत.. पण सजीव, सचेतन, परिपूर्ण व्यक्तींची आई होताना कसं वाटलं असेल? कदाचित आम्हा पामरांना कधीच नाही कळायचं ते. मुळात कुठल्या सोशीक चक्राशी फारसा संबंधच नसतो आमचा. ना आर्तवचक्र, ना प्रसूतिवेणा. एखादा पाण्याचा हौद हळूहळू भरावा, एवढा एक भरल्यावर त्याचा नळ धो धो वाहत राहावा आणि मग पाणी सावकाश आटून जावं, तसे फुस्स संपून जातो आम्ही. एखाद्या सरळ ओढून संपणा-या रेघेसारखे, फार तर बाणासारखे.. चाकासारखे आवर्ती नाही.


.. मजाच आहे. तू होतीस तेव्हा तुझ्या डोळ्यांतून झाडं-फुलं दिसत-उमगत गेली, आता त्यांच्यामधून तू आकळत जातेयस.

पुढचा आवर्त कधी?


- मंदार.

5 comments:

Milind Gadre said...

खूप सुंदर!
आवडला!

Milind Gadre said...

"ती आखणी, ते नियम त्यांच्या पायांच्या बेड्या नाही होऊ शकत, पैंजणं होऊन जातात."
^:)^

Shreerang Chhatre said...

मंदार,
लघुनिबंध म्हणजे काय - याचा एक सुन्दर नमूना म्हणजे हा लेख आहे. भाषेची सौंदर्य स्थाने उत्कृष्ट आहेतच पण ती मूळ आशयाला बाधक नाहीत. शक्य असेल तर एखाद्या समीक्षकाकड़े पाठव हा लेख.
- श्रीरंग

prasad bokil said...

सुंदर लिहीलं आहेस रे.
शेवटचे दोन परिच्छेद जास्त भावले. म्हणजे पहिले चांगले नाहीत असे नाही.
सुरूवातीचे निसर्गवर्णन नवे नसले आणि त्यासाठीचा चेतनागुणोक्तीचा वापरही नवा नसला तरी
त्याला तुझी स्वतःची सहज शैली दिलेली आहेस. तो निरागस भाव शेवटी शेवटी आवर्तनातून आर्तवा कडे जाताना
फारच सुंदर भावुक आणि प्रगल्भ झाला आहे. त्या आर्तवाचा हलकेच स्पर्श वाचणार्‍याला अस्वस्थ करणारा आहे.
(समीक्षा करणार्‍याला स्वतःला लिहीता आले नाही तरी चालते या पूर्वकल्पितावर अवलंबून अजून एक सांगायचे धाडस करतो-)
यामधे आवर्तन आणि आर्तव हे जे सुंदर शब्द योजीले आहेस त्याला अधिक न्याय देण्यासाठी जर एका ठिकाणी सुरू होऊन आपण परत परत तिथेच येऊन पोचत आहोत
आणि प्रत्येकवेळी तीच जागा सम सापडल्यासारखी गवसते आहे आणि तरी ती प्रत्येकवेळी नवा आनुभव देते आहे असे जर हे गुंफलेस तर अजून समृद्ध वाटेल.
जसे की ऋत्विक घटक यांचा ’सुबर्णरेखा’. पाहीला नसशील तर जरूर बघ. त्यात हे आर्तवाचे आवर्तन अनुभवायला मिळते.

Mandar Gadre said...

धन्यवाद, प्रसाद!
थोडं कळतंय तू काय म्हणतोयस ते. नक्की प्रयत्न करेन आता.
काल मुद्दाम पाहिला 'सुबर्नरेखा' - सुरेख आहे! (माधबीच्या डोळ्यांवर जीव ओवाळून टाकला!)