Saturday, July 24, 2010

मावसबोलीतल्या कविता

मोठी मुलं-मुली त्यांना कधी लहर आली की उगाच लिंबूटिंबूंनाही खेळायला घेतात, तसा मला आज सईकडून "मावसबोलीतल्या कवितां"चा खो मिळाला, तेव्हा डोक्यात "जिहाल-ए-मिस्कीं" ही अमिर खुस्रोंची दोन भाषांतली रचना आली. लहानपणापासून भरभक्कम संख्येने लाभलेल्या नातेवाईकांत राहिलो असल्यामुळे असेल कदाचित - एक सोडून दोन मावसबोल्या असलेली ही कविता निवडलीये. पर्शियन आणि ब्रज अश्या दोन भाषांत एक-आड-एक ओळी असलेली अप्रतिम रचना आहे ही. (पुढे पर्शियन, अरबी, तुर्की, हिंदी - अश्याच मिश्रणातून उर्दू जन्माला आली.)

ही रचना मी पहिल्यांदा गुलाम अलींच्या आवाजात इथे ऐकली होती. माझ्या नाहीत पण निदान माझ्या खापर-खापर-खापर-..-खापर पणजी-पणजोबांच्या तरी मावसबोल्या असू शकतील अश्या ह्या दोन भाषांमधलं काव्य पेलायला घेतलंय - चू. भू. द्या. घ्या.

'अनुवाद' करताना माहितीजालावर एक-दोन ठिकाणी मिळालेला इंग्रजी अनुवाद आधाराला धरलाय. पण (त्यांनी समाधान न झाल्यामुळे) उनाड मुलं पावसात आईबरोबर रस्त्यावरुन चालताना जेवढं तिचं बोट धरतात तेवढाच.


मूळ रचना:

Zehal-e miskin makun taghaful, duraye naina banaye batiyan,
ki taab-e hijran nadaram ay jaan, na leho kaahe lagaye chhatiyan.

Shaban-e hijran daraz chun zulf wa roz-e waslat cho umr kotah,
Sakhi piya ko jo main na dekhun to kaise kaatun andheri ratiyan.

Yakayak az dil do chashm-e jadoo basad farebam baburd taskin,
Kise pari hai jo jaa sunaave piyare pi ko hamaari batiyan.

Choo sham-e-sozan, choo zarra hairan, ze muhre-aan mahgushtam aakhir,
Na neend naina na ang chaina na aap aaven na bhejen patiyan.

Bahaqq-e roz-e wisal-e dilbar ki daad mara ghareeb Khusrau,
Sapet man ke waraaye raakhun jo jaaye paaon piya ke khatiyan.

- Amir Khusro.


अनुवादाचा प्रयत्न:

"का दृष्टि वळविसी दूर, विरहि मी चूर-चूर तुझिया रे,
हा श्चास तुटत चालला, उराशी मला धरी सदया रे,
बोलुनी भुलविणे किती! रात्र सवतीसवेच सरली रे!
मम धीर सुटत चालला, आपुली मला करी सखया रे!


हे लांब कुरल तव केश जसा विश्लेष दीर्घ रात्रीचा,
भासते आयु अत्यल्प जसा दिन स्वल्प तुझ्या भेटीचा,
रात्र न ही कंठवी दिसे मुखरवी न तो सखयाचा,
सखी! मार्ग तो सांग! जाळि सर्वांग अग्नि विरहाचा.


नेत्रांनी दावुन कळा लावुनी लळा जिंकिले होते,
जाणिले सखे सहजीच, मी न माझीच राहिले होते,
हे ऐकुन नि:श्वसतात, सख्या श्रवतात विरहिणी-गीते -
पण विरहाची ही कथा कुणितरी कथा जाउनी त्यांते!


ज्योत माझि थरथरे भरे कापरे भान ना राही,
तव प्रेमाग्नीचा संग रक्त रतिरंग अंगि रे वाही,
निद्रेला झाले वंचित तरिही किंचित आशा राही -
पाहीन तुझे पाऊलच किंवा चाहुल लागो काही!"


परि एकच निश्चय मनी करे मानिनी 'अमिर' सांगती,
"पाहते सख्याची वाट असो घनदाट तमाची भीती,
मोहते जरी मज वाट जात जी थेट सख्याच्या पुढती,
आदरिते मीलनदिन तो, शील न ब्रजबाला सोडती."


- मंदार.


आता माझा 'खो' प्रिया ला!

Wednesday, July 21, 2010

समुद्र.

फार प्रेमळ आहे ती.
हक्कानं जिच्याकडून लाड करून घ्यावेत अशी.
खट्टी-मीठी.
दिवसभर तोंडात धरली
तरी हव्याश्या वाटणा-या चिंचेसारखी लाघवी.
उगाच नुसत्या मिट्ट गोड साखरेसारखी नाही.

तिच्या नात्यांकडे पाहिलं तर
पोटातली माया समजते हळू-हळू.

कुरळे अल्लड केस एकत्र घेऊन
एक सुरेख वेणी घालावी, तशी
एकमेकांत गुंफलीयेत तिची सगळी नाती.
आहेत मोजकीच, पण अगदी घट्ट.
एकाच डोंगरातून उड्या मारत येणारे झरे
एकत्र येऊन नदी साजरी करतात तसंच.


तो?
वेडाय फक्त.
मनास आल्याशिवाय काहीच नाही करणार कधीच.
आणि तसं वागण्याचे जे काही भोग असतील
ते आनंदात भोगणार.
पश्चात्ताप वगैरे गोष्टींना मनात जागाच नाही.
सारख्या काही ना काही केलेल्या धडपडींचं बक्षीस
म्हणून खरचटणं ठरलेलंच.
ते उगाच लपवणार नाही
आणि दाखवत फिरणारही नाही.
मनात जपून मात्र ठेवणार!

त्याची सगळी नाती म्हणजे मनसोक्त भटकणा-या,
कधी मनात आलं तरच एकमेकींना चेहरा दाखवणा-या
डोंगरातल्या चुकार पायवाटा.
वैरिणी नसतील, पण सोय-याही नाहीत.
एकाच मनगटातून निघणारी
पण बाकी काहीच साम्य नसलेली पाच बोटं.


एकदा ते दोघं भेटले.
आणि मग भेटतच राहिले.

पुढे कधीतरी त्याची नातीही भेटली एकमेकांना,
तेव्हा त्याच्या लक्षात आलं -
समुद्राशी भेट जवळ आल्यावर
नदीला फाटे फुटतात
तेवढीच काय ती लांब होती एकमेकांपासून.
आणि त्याच्याच आतून आलेली ती सगळी,
एकदा समुद्रात मिसळून गेल्यावर
वेगळी का करता येणार होती?

नाती त्याची होती,
समुद्र तिचा.


- मंदार.