Tuesday, August 05, 2008

पुन्हा एकवार

अखेरीचं बोलावीन तुला आतड्यापासून
पुन्हा एकदा साहीन तुझा नकार हासून

अखेरीचं ऐकवीन माझ्या मानसीचं गूज
पुन्हा वठल्या झाडांत पालवीची कुजबूज

अखेरीचं थांबवीन तुला निघून जाताना
पुन्हा वाटेवर पाय असे अवघडताना

अखेरीचं पांघरीन तुझं लागलेलं वेड
पुन्हा शहाण्या डोक्याने वेड्या मनालाच छेद

अखेरीचं विचारीन सखे सोबत येशील?
दोन घडीच्या डावाची भागीदारीण होशील?

- मंदार.

Tuesday, July 29, 2008

ऋण-भार

उपकार-फेड सौदा परक्यांत होत आहे
मित्रांस स्निग्धतेचा का भार होत आहे?

जरि पांघरूण त्याला उबदार घातले मी
ओझेच त्या उबेचे सखयास होत आहे

धरणीस पावसाचा भालास कुंकुमाचा
कुसुमांस गुंजनाचा का जाच होत आहे?

’माझा’ म्हणून केले, प्रेमार्द्र अंतराने
ऋणभार-क्लेश माझ्या हृदयास होत आहे

वाटे, ऋणे असावी ऐशी मधाळलेली
मधुमास आपुला का वैशाख होत आहे?


मंदार.

Monday, July 28, 2008

तीन तिघाडा

घशाखाली भाकरी घालून तो जरा पडला
ती बाहेर उन्हात गोव-या वाळवत होती

तीच वाळली, गोव-या ओल्या आणि तो कोरडा राहिला.

----------------

बहात्तर कुमारिकांपायी पडतायत
रोज असंख्य जीवांच्या आहुती

ते यज्ञ कधीपासून करायला लागले?

-----------------

सीतेसंगे स्वर्ग भासे वनवास रामाचा
कर्तव्या जागुन आत्मा होई धन्य लक्ष्मणाचा

प्रासादी राहुन वनवास होता - फक्त उर्मिलेचा



मंदार.

Friday, July 11, 2008

अताशा असे हे मला काय होते ..

(खरेभाऊंची माफी मागून)

अताशा असे हे मला काय होते
कुण्या काळची झोप डोळ्यांत येते
बरा वाचता वाचता पेंगतो मी
अशी लेखणी हातुनी खालिं पडते

कधी आवरू पुस्तकांचा पसारा
कधी सावरू तो टीपांचा ढिगारा
असे चालती हात हे संथ माझे
गोंधळात ह्या वेंधळा मी बिचारा

न लेखांक कुठले, न संदर्भ काही
न कुठले परिच्छेद, सूत्रे न काही
जसा दारुडा जाइ रस्त्यावरूनी
तसा काहिसा काटतो मार्ग मीही

असा ऐकु ये मास्तरांचा पुकारा
क्षणी दूर हो आळशी नूर सारा
असे ढवळते आत जोरात काही
जसा बैल घे आसुडाचा इशारा

कशी ही अवस्था कुणाला कळावे?
कुणाला पुसावे ? कुणी उत्तरावे ?
किती रोज करतो, तरी काम उरते
असे काम उरता, कुणी आटपावे ?


मंदार.

Friday, March 21, 2008

Monday, March 03, 2008

मास्तरांचा धावा .. !

माझे मास्तर फार म्हणजे फारच व्यस्त असतात. (ह्या ’व्यस्त’तेचा त्यांच्या आणि माझ्या कामाच्या प्रमाणाशी काहीही संबंध नाही!)
तर त्यांच्यासाठी मी एक ’धावा’ लिहिलाय -

(मूळ गीत: एकवार पंखावरुनी ..)

(गदिमांची माफी मागून):

एकवार मसुद्यावरुनी फिरो तुझा हात
कामाचे सार्थक माझ्या, तुझ्या स्वाक्ष-यांत

विद्यापीठी अवघा फिरलो
तुझ्या हापिसाशी बसलो
उपाहारगृही केव्हां, कधी व्हरांड्यात

वर्ग, प्रयोगशाळा ही
धुंडाळल्या त्या बागाही
तुझ्याविना नव्हते कोणी, माझिया मनात

फुशारून जाउन कोणी
तुझ्यापुढे नाचे ’राणी’
तुझ्यासवे बोलत बसतो, कुणी भाग्यवंत

मुका बावरा मी भोळा
पडेन का तुझिया डोळा ?
कधिही सांग, तेव्हां येइन तुझ्या हापिसात

Tuesday, February 19, 2008

शिवराय

निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु ।
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥

परोपकाराचिये राशी । उदंड घडती जयासी ।
तयाचे गुणमहत्त्वासी । तुळणा कैची ॥

यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
नीतिवंत पुण्यवंत । जाणता राजा ॥

आचारशीळ विचारशीळ । दानशीळ धर्मशीळ ।
सर्वज्ञपणे सुशीळ । सकळां ठायी ॥

नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति ।
पुरंदर आणि शक्ती । पृष्ठभागीं ॥

धीर उदार गंभीर । शूर क्रियेसि तत्पर ।
सावधपणे नृपवर । तुच्छ केले ॥

तीर्थेक्षेत्रे मोडिली । ब्राह्मणस्थाने भ्रष्ट जाली ।
सकळ पृथ्वी आंदोळली । धर्म गेला ॥

देव-धर्म-गोब्राह्मण । करावया संरक्षण ।
हृदयस्थ जाला नारायण । प्रेरणा केली ॥

उदंड पंडित पुराणिक । कवीश्वर याज्ञिक वैदिक ।
धूर्त तार्किक सभानायक । तुमच्या ठायी ॥

या भूमंडळाचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्रधर्म राहिला काही । तुम्हां कारणे ॥

आणिकही धर्मकृत्ये चालती । आश्रित होऊन कित्येक राहती ।
धन्य धन्य तुमची कीर्ती । विश्वीं विस्तारिली ॥

कित्येक दुष्ट संहारिले । कित्येकांसी धाक सुटले ।
कित्येकांस आश्रय जाले । शिवकल्याण राजा ॥

तुमचे देशी वास्तव्य केले । परंतु वर्तमान नाही घेतले ।
ऋणानुबंधे विस्मरण जाले । काय नेणो ॥

सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती । सांगणे काय तुम्हाप्रती ।
धर्मसंस्थापनेची कीर्ती । सांभाळिली पाहिजे ॥

उदंड राजकारण तटले । तेणे चित्त विभागले ।
प्रसंग नसता लिहिले । क्षमा केली पाहिजे ॥

-- (समर्थ रामदासांचे छत्रपतींस पत्र)

Friday, February 15, 2008

बाबांस ..

एखाद्या धगधगत्या ज्वालेनं आपलं तेज लक्ष लक्ष ज्योतींना द्यावं,
तेजाळ सूर्यानं धरतीवरची काळरात्र एका क्षणात निखंदून टाकावी,
तसंच ..

गरुडानं चिमण्या-कावळ्यांना, राघू-मैनांना उत्तुंग भरारीसाठी पंख द्यावेत,
आणि एखाद्या वटवृक्षानं त्यांच्या तप्त आत्म्यांना मायेची सावली द्यावी,
तसंच ..

एखाद्या मातेनं आपल्या रक्ताचं स्तन्यामृत पेशीपेशींना पाजावं,
एखाद्या पित्यानं अजाण असहाय अडखळणा-या पावलांना वाट दाखवावी,
तसंच ..

बाबा, तसंच, तुम्ही केलंत - दिलंत - दाखवलंत !

"ज्वाला उफाळत जश्या वर जावयाते,
ध्येये तशीच अमुची असू देत माते!"

अश्या तुमच्या ध्येयांना म्हणतोय आमचं.
तुम्ही आणलेल्या वादळातलं मूठभर आमच्याही छातीत घेतोय साठवून.
तुमच्या हातातल्या मशालीवर लावतोय आमचीही एक पणती.

अश्या ध्येयांची स्वप्नं पेलवतील ना आम्हाला?
अश्या वादळात अभंग राहील ना आमची छाती?
आणि हातातली ती पणती सांभाळू शकू ना आम्ही?
... अश्या सगळ्या शंका-कुशंका-अविश्वासाला तिलांजली देतोय आज.

तुम्हीच एकदा लिहिलं होतं -
"जहाजाबरोबर स्वत:ला बुडवून घेणारे कर्णधार जेथे असतात,
तेथेच बुडता देश वाचवणा-या नाविकांच्या पिढ्या जन्म घेतात!"

बाबा,
अज्ञाताच्या दिशेनं जाताना भेटतील तुम्हाला किनारे, आणि लाटांचे कल्लोळही.
आमची वाट पाहणा-या किना-यांना,
आणि लाटांच्या त्या उग्र कल्लोळांना इतकंच सांगाल?
.. आम्ही अजून जहाज सोडलेलं नाही!