Thursday, December 10, 2009

निरोप


निघताना ओठी नि:शब्द निरोप,

नि:श्वास निर्माल्य .. निग्रहाचे.


- मंदार.

Thursday, October 15, 2009

दीप-दान

सांजवाती विसरून
चांदण्यांत रमे ज्योती
पुन्हा प्रकाशाची वाट
स्निग्ध समया पाहती

दिवाळीच्या संध्याकाळी
ज्योती ज्योतींनी पेटवा
सोनतेजाच्या दूतांना
त्यांची लेकुरे भेटवा ..!

🎇  दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !  🎇

- मंदार.

Monday, October 12, 2009

तो. मी. आपण.

जुने ते मुळांतून छाटीत जातो
नवी रोपटे तेथ लावीत जातो

जुनी प्रश्नचिन्हे पुन्हा पाहताना
नव्या ठोकताळ्यांस मांडीत जातो

जुन्याचा जराही कधी भास होता
नव्याची मनी दृष्ट काढीत जातो

जुन्या चित्रमालेतले रंग उडले
नवे गोजिरे रूप रेखीत जातो

जुने बंध सुटले, गडी तो नव्याने
नवे राज्य घेण्यास शोधीत जातो

- मंदार.

Monday, September 14, 2009

निमित्त

शुक्राला लाजून
पश्चिमा आरक्त
केवळ निमित्त
संध्याकाळ..


मंदार.

Tuesday, September 08, 2009

चौकटभरती

आमचा एक दोस्त अधूनमधून छोट्या-छोट्या मुक्त-कविता पाठवतो.. थोडेसेच रंग भरून एखाद्या चित्राचा कागद पाठवावा, तश्या.
त्याच्यासाठी -


चार-सहा ओळींची कविता
अर्थ तिचा मी लावुन पाही
गूढ काहिसे अस्फुट सांगे
कठोर थोडे हळवे काही

जणु शेताची कोरी पाटी
काळ्या नवथर नांगरलेल्या
एखाद्या चित्राची चौकट
अर्ध्यामुर्ध्या रंगवलेल्या

घुम्या रिकाम्या खोल्याखिडक्या
जणू कुणाची वाट पाहती
समईसाठी शांत थांबल्या
तेल लेउनी त्या फुलवाती

राहुन गेला चिक्कणगोळा
कुंभाराच्या चाकावरचा
अर्धाअधुरा गोंदणनमुना
कुण्या गोरट्या देहावरचा

फत्तर पाहुन ओबडधोबड
मज लेण्यांचा छंद जडे
अपुरे अनगड हाती येता
पूर्णत्वाचा फंद चढे


- मंदार.

Wednesday, September 02, 2009

रंगवेड्या


अंग तापलं तापलं गोरं उन्हात रापलं
राधे तरी का होईना रूप श्यामल आपलं..?

दूधरंगी उत्तरीय, गळा शुभ्र मोतीमाळा
अश्या साजावीण दिसे हरी तेजाळ सावळा

पहाटेचा नंदलाल खेळे नभाशी गुलाल
रक्तवर्णाहून त्याच्या फिके लाजरे हे गाल

सांजसूर्याचा सोनेरी श्याम आवळाजावळा
अंगी आपल्या दागिने फुका सोनियाच्या झळा

राधे आपल्या मनात बहुरूपी तो नांदतो
जसा सप्तरंगी सेतू सार्‍या थेंबांत राहतो

- मंदार.

(सप्टेंबर २००९)

Friday, August 28, 2009

पिंपळपान

आज तू नाहीयेस. नुसताच कैक मैल उठून लांब गेला असतास तर मी एवढा पत्रप्रपंच मांडला नसता. पण आता जो गेलायस ते कायमचाच..
आणि इथे बसून मलाच सांगतोय मी, जे तुला शब्दांत कधीही सांगितलं नसतं.


तुला कधीही ’धन्यवाद, थॅंक्स, सॉरी’ असं म्हणलेलं आवडायचं नाही. मैत्रीत कसलं आलंय धन्यवाद देणं, क्षमा मागणं? मित्राचं उबदार ऋण असं काहीतरी बोलून फेडण्यासाठी नसतंच मुळी.

आठवतंय तू एकदा म्हणाला होतास - पांघरुणात थंडी वाजत नाही ती स्वत:च्याच अंगच्या उबेमुळे. झोपताना आधी नाही का, ती गादी आणि पांघरूण गरम करावं लागत - आपल्याच शरीरानं?
कुणी कुणाची अंगची ऊब नाही होऊ शकत, पण पांघरूण तर होऊ शकतं ना.. अंगची ऊब धरून ठेवायला मदत करणारं? ते तू झालास.

डोंगर चढताना आपल्याला आपल्याच पायांवर चढावा लागतो. तिथे का कुणी उचलून घ्यायला येणार असतं? आणि यावं अशी इच्छा एकवेळ होईलही; अपेक्षा नसते, नसावी.
तश्या चढणीवर कुणी आपला भोई नाही होऊ शकत, पण सहप्रवासी तर होऊ शकतो ना - दोन पावलं पुढे जाऊन मग आपल्यासाठी थांबणारा, अडखळलो तर हात देणारा ..? तो तू झालास.

अरे एवढंच काय, व्यायाम करायला गेल्यावर तू तुझा(च) आणि मी माझा(च) व्यायाम करू शकतो. ना तुझ्या वाटचं मी पळू शकत, ना माझ्या वाटची वजनं तू उचलू शकत. तिथे कामच काय खरं तर दुस-याचं?
पण तो दुसरा आपल्या फक्त तिथे असण्याने एक वेगळाच जोश आणू शकतो.. तो तू आणलास.

माझ्याच मनातल्या भावनांची गुंतागुंत.. ती तंतोतंत कशी समजणार कुणा दुस-याला?
पण एखाद्या चुरगाळलेल्या रुमालाला इस्त्री करून मग त्यावरच्या नाजुक नक्षीचा धागा-धागा उलगडून दाखवू शकतोच ना एखादा? तसं तू दाखवलंस.

आणि असं काहीही करत असताना, तुझ्यात यत्किंचित अभिनिवेश नव्हता. ते तू तुझ्यासाठी करत होतास, तुला मजा यायची म्हणून. म्हणूनच, ना तुला ते चिकटायचं, ना माझ्यासारख्याला त्याचं ओझं व्हायचं.


.. जाताना ती चंदनाची पेटी मात्र डोंगराएवढी जड करून गेलास.


मंदार.

Thursday, August 20, 2009

भेट

दोन खडबडीत हातांनी बनवलेलं एक ओबडधोबड कोडं पाठवतोय.
सहा तुकड्यांचं कोडं.
कसे एकमेकात गुंफलेत बघ ना ..
आणि तसं गुंफत जाताना त्या सगळ्यांनी मिळून त्या आतल्या सापटीत काय काय लपवलंय - मजा येईल शोधायला.

तसं ह्या तुकड्यांना मोकळं करणं अवघड नाहीये.
फक्त, नको तिथे ओढाताण करून काही साधत नाही.
नाजूक हातांनी सोडवायची गुंफण आहे ही.

पण खरी मजा आहे ती त्यांना परत जोडून एक सुरेख मोट बांधण्यात.
कोणता तुकडा कोणाबरोबर कसा गुंतलाय .. ते उमगण्यात.

आपल्या मनातले षड्भाव असे आधी सुटे-सुटे करून पाहावे,
आणि मग पुन्हा त्यांची एकमेकात रेखीव गुंफण घालावी.

कधी होतील ते सहा ऋतू. कधी सहा संवेदना. मारव्याचे सहा सूर.
लाकडाचीच खेळणी ती - मनात येईल त्या रूपात पाहावं त्यांना.
कधी ते होतील षड्रिपू. मग त्यांची एक मोळी बांधून गंगार्पण करावी.
अशी मोळी परत तरंगून येईल वर. मग कळावं, की त्या सहांना असं नुस्तं खाली दाबून उपयोग नाही.
जे जाऴलं पाहिजे, त्याला पाण्यात टाकून कसं चालेल? तश्याने उलट जाळणं अवघड होणार!

बघ. सोडव. बांध मोट. मजा कर!


मंदार.

Saturday, July 11, 2009

मालवगंध

कधीकधी अचानक खुळीसारखी थांबते मी जागीच. डोळे दूरच्या वाटेकडे, अंगभर रोमांच, जिभेवर मधगोडवा.. कानांत घुमणारी हाक, आणि मग तो वेडावणारा गंध. श्रावणातला मृद्गंधराज आणि अंगणात पानागणिक तटतटून फुलणा-या रातराणीचा वास - माझे जीव की प्राण! .. पण तू आलास आणि ते दोन्ही विसरून गेले रे. कसा आत आत भिनत गेलायस माझ्या! रूप-स्पर्श-रस-शब्दांतून त्या अनामिक गंधाकडे जाणं - जणू तारसप्तकातल्या गंधारापर्यंत चढणारी सुरेल तान.

तुझं रूप, माझ्या मारव्यातला कोमल ऋषभ .. रागाची सगळी अदाकारी एकहाती तोलून धरणारा. पहिल्यांदा दिसलास तोच मुळी नुकत्या उगवलेल्या पौर्णिमचंद्रासारखा. ती चांदमोहिनी उतरलीच नाही कधी. मग पाहणं घडलं ते शारीर डोळ्यांच्या पलीकडचं - 'दृष्टीचा डोळा पाहों मी गेले तंव। भीतरी पालटु झाला।'

मग तीव्र मध्यमाचा तो अधीरस्पर्श. खरंतर रोज दह्यादुधात माखणारे हात माझे - पण तुझ्या घट्टे पडलेल्या खरखरीत हातांचा स्पर्श हवाहवासाच वाटला, को-या नऊवारीसारखा. उत्कटता कळायला आवेगच दिसायला पाहिजे असं काही नाही.. तुझ्या संयतस्पर्शानं मध्यमाचं नाव तसंच सार्थ केलं.

दोन नवख्या व्यक्ती भेटल्यावर एकमेकांची सवय होईतो जाणारा वेळ, वाटणारं अवघडलेपण - आपल्या मारव्यामध्ये तो हेकट अचल पंचम असणार होताच कुठे? सोड. इतक्या सुरेल गोष्टीबद्दल बोलताना असले शब्दही नकोत.

शुद्ध धैवताचा निखळ, शांतरस आकंठ प्यायले, तो तुझ्याच ओठांनी. तोपर्यंत अनामगूढ वाटणारा धृतधैवत इतका मोकळा होऊन समोर आला.. त्याला चिकटवलेला सगळा फसवा चकवा क्षणात गळून पडला. इतका, की तो रूपऋषभाचा संवादी व्हावा.

माझी उरलीसुरली शिकार केली ती तुझ्या शब्दनिषादानं. त्याचं वेडच असं लागलं की 'मा निषाद' न म्हणता मी आपणहोऊन आपलं मस्तक अर्पण केलं. निषादाची खुमारी हीच, की त्यात आपल्या दोघांच्या एकाकार होण्याच्या भावषड्जाची चाहूल लागते मला.

माझ्या मारव्याच्या तानेचा कळस मात्र होता मालवगंध. बाकी सगळ्या सगळ्या शारीर संवेदना अत्यंत अचेतन, मंद वाटाव्यात असा हा तारगंधार. ऋषभ-धैवतासारखा त्यावर भावनटराजाचा पदन्यास होत नसेल - पण त्याला अश्या सहेतुक विरामाची गरजच नाही! तो आहेच मुळी जड जाणिवांच्या पलीकडला. 'होईल थोरपण जाणिवेचा भार ॥ दुरावती दूर पाय तुझे ॥'.. जिथे जाणिवांचाही भार होतो, अश्या उच्च ठिकाणी सजवलाय त्याला.

अशी सुरेल चढत गेलेली तानशलाका स्वगृही परत येते ती भावषड्जावर. आपलं एकत्र विकसित द्वैत त्याच्या लखलखीत रूपात पुढे येतं. काय सांगावं त्याबद्दल? तिथे जाणीव-नेणीव उरत नाही. काही समजून घ्यायचं नाही, काही समजावायचं नाही; फक्त त्या आनंदात डुंबायचं आहे.
'जाणीव नेणीव आघवी ॥ वोवाळीन तयावरुनि ॥'


मंदार.

Sunday, June 28, 2009

तू चानी..

तुझ्या 'रोबी'ची कोथा वाचून दाखवत होतीस मला तेव्हा. टिपूर चांदणं पडलेल्या त्या तळ्याशेजारच्या माळरानावार आपण दोघंच. आत खोपटात न जाता काळसर निळ्या नभाचं छप्पर करून पहुडलेले. उन्हाळ्यात उकडतं म्हणून घराबाहेर खाट टाकून झोपायचो तसेच.
ती धुवट खसखशीत चादर अजून लागतेय मांडीला. काळेकुरळे केस सावरून आलेली तू, आणि तुझ्या हातांना येणारा तो मंद सुवास. उगाच वाटतं की तू हात धुतलेल्या पाण्यालाही मोग-याचा गंध येत असणार.
गोष्ट चालूच. हळुवार पानं उलटणा-या तुझ्या लांबसडक बोटांकडे पाहात बसलेला मी. "दोन माणसांमधलं आकाशाएवढं अंतर" - तुझ्या आवाजात ऐकताना कसे आरपार जातात शब्द!
कसा विसरेन?


त्या डोंगरउतारावरून जाताना पार दमून गेलेली तू. कुठे कुठे झाडझाडो-याची सावली शोधणारी. उन्हाला डोक्यावर काही धर म्हणलं तर मात्र ऐकायची नाहीस.
मग त्या मोठ्याश्या खडकापाशी आपण दोघं. माझा हात पक्का धरून खाली उतरू बघत होतीस. मजबूत पकड जमली होती अगदी. पण तुझा पाय कुठे पुरत होता खालपर्यंत?
"सोडू नको रे माझा हात" - तुझा जणू विनवणीचा सूर. आणि माझं आश्वासन. पण तुझी उडी मारायची वेळ झाली, आणि सोडायला सांगितलास हात. त्या गडबडीत तुला खरचटायचं ते खरचटलंच. पण तुझी शप्पथ गं, मी मुद्दाम नव्हतं केलं ते. उलट तू 'सोड' म्हणल्यावरही क्षणभर जास्तच धरलं होतं तुला.
.. बरंय, फक्त हातच खरचटला.
कधीच नाही विसरणार ते.



कड्यावरून असं इतकं ओठंगून खाली पाहायचं नाही - कितीदा सांगितलंय? तू तशी वाकायचीस तेव्हा माझ्या कपाळावर आठ्या. दोनदा तर दंडाला धरून तुला खाली बसवलं मी.
आणि मी नको तिथे चढून माकडमजा करायचो तेव्हाची तुझी चिडचीड. कड्यावरच्या झाडावर चढलंच पाहिजे का - असं विचारणं. तुझ्या डोळ्यातली ती उबदार काळजी बघण्यासाठी अशी छप्पन झाडं चढेन मी.
कसं म्हणतेस विसरून जाईन?



एकामागून एक येऊन कोसळणारी, अर्धवट कळणारी तुझी वाक्यं डोळे मोठे करून ऐकत बसलेला मी. एकसंध असं तुला कदाचित बोलता येत नसावं.
पण तुझ्या वृत्तीला शोभतं ते. आपल्या येण्याची दहा प्रकारे चाहूल देऊन मग एखाद्या राजासारखा नभोमंडपी प्रवेशणारा गगनराज नाहीसच तू. तू तर रात्रीच्या अखंड काळ्या आकाशात क्षणात चमकून जाऊन डोळे दिपवणारी शलाका. मला काही समजायच्या आधीच नभापार निघून गेलेली. ज्याला दिसेल, त्यालाच तुझ्या अस्तित्वाची जाणीव होणार. ज्यांनी पाहिलीच नाही, त्यांना कळावीस कशी?
आणि मग वेडे, मला पामराला विचारत होतीस काय वाटतंय म्हणून!



मला काय वाटतंय, ते तुला निरोपाची गळामिठी घालताना माझ्या डोळ्यात दिसलं ना तुला?

- मंदार.

Friday, May 29, 2009

दुर्मिळहो!

फुले लाख गेली तळाशी गळूनी, मनी स्फुंदतो भंगला पारिजात
फुका दान गेले जगी सुंदराचे, न केसांत कोणी तयां माळतात
फुले ब्रह्मकमळीं पहाणेच केवळ - प्रतीक्षा तयाची सुयोगासमान
बघा दुर्मिळांची कशी कौतुके ही, तयांनाच मिळतो यथायोग्य मान

..

हेच सांगतोय मी तुला.
तू का उगीच इतकी सहज-सोपी होतेयस? नेहेमीच का आहेस तू आसपास - त्यांच्या सगळ्यांसाठीच? कधीही हाक मारा, आहेस आपली जवळच. कशाला असं?
नको ना, तू स्वत: नकोच जाऊन बोलूस. त्यांनी न लिहिलेल्या पत्रांची किती उत्तरं लिहिणारेस? आणि आता वर भेटायला जाणारेस - पण तूच का जायचंस सारखं? जर गेलीसच तर चार नको, दोनच दिवस जा.
कळूदे ना त्यांना तरी, की तूही कुणीतरी आहेस. त्यांच्यासारखीच एक ..

..

नाही! त्यांच्यापेक्षा वेगळीच आहेस.
स्वैर नाही, स्वतंत्र. आपल्याकडे जे आहे, त्याची मुक्तपणे उधळण करणारी.
मोजदाद तर तुला माहीत नाहीच - कोणी किती काय परत दिलं असले फाल्तू प्रश्न तुझ्या वाटचे मलाच पडतात!
तू देत राहतेस फक्त. मनापासून. मला खोलवर आवडतं ते हेच, की तुला चिकटू शकत नाही तुझं देणं.

मीच वेडाय.

कळत नाही का मला?
एक दिवस नदी होण्याचं स्वप्न पाणीदार डोळ्यांत घेऊन त्या उंच कड्याकपारीतून उड्या मारत आलेली निर्झरा तू.
त्यांच्यासारखी कशी असशील?

दुर्मिळ आहेसच. तशीच राहा :)

Thursday, May 28, 2009

तिपेडी

खोलीच्या चार भिंतींमधून कचेरीच्या चार भिंतींकडे
बंदिस्तपणे घेऊन जातात गाडीची चार चाकं

छोट्या चौकटीत टपोरा मोती बसणार कसा?

___________


कोरा चेक दिला तिनं मला सही करून
"घे.. हवं तितकं!" हसून म्हणाले डोळे तिचे

माझ्या मनात न मावणारं तिच्या खात्यात कसं मावलं ?

___________

चांदणरात्री सखीची त-हाच निराळी असते
असते माझ्याबरोबर, लाजते चंद्राला बघून

चंद्र आणि मी एकमेकांचा हेवा करतो..



- मंदार.

Wednesday, May 20, 2009

री.

दोरी एकाच्या हातात
दुस-याच्या ती गळ्यात
दोन्ही कठपुतळ्याच.

दोन कड्यांवर पूल.
दोरी नाही ढकलत,
नेते आयुष्य ओढत.

जळे सुंभ, सुतळीही
नाही पीळ जात, पण
काजळे गं काळजात.

गुंतागुंत आणि गाठी
छोट्या दोरीच्या ललाटी,
मोठी प्राणांनाच गाठी.

- मंदार.

Friday, May 01, 2009

निरपेक्ष

माझ्याशी नाम्याचा विठू बोलणार नाही
पण तरी आळवणी मी सोडणार नाही

सोबतीला कुणीसुद्धा जरी असणार नाही
वाट एकटा चालेन वसा टाकणार नाही

बरसेल खडकांच्या पालथ्याच घड्यावर
पण आकाशीची गंगा कधी सुकणार नाही

ढळेल ना रतीभर जरी धरती लाटांनी
प्रेमभरती सागरी कधी आटणार नाही

आलं एखादंही नाही जरी आज गि-हाईक
मी पडेतो काळोख दारं मिटणार नाही

रणरणत्या उन्हात कोणी बघाया जाईना
माळरानीचा पळस हिरमुसणार नाही

ना येवो पडसाद कड्याकपारींमधून
साद घालणं तरीही माझं थांबणार नाही


- मंदार.

Thursday, April 23, 2009

नक्कल !?

नक्कल करणे मला कधी ते जमतच नाही
नक्कल करुनी काय साधते कळतच नाही

नक्कल करणे आवाजाची असे कुशलता
पण दुस-याचा स्वर गुणगुणणे रुचतच नाही

चेह-यावरचे भाव कठिण ते नकलायाला
चेह-यावर बोलक्या, मुखवटा चढतच नाही

नकलेसाठी सूक्ष्म पाहिजे जरी निरीक्षण
स्वत:इतके जवळुन कोणी दिसतच नाही

नकलेसाठी शोधावी लागतात पात्रे
इथे कुणाची चाहुल कानी पडतच नाही

करता नक्कल लपवावे लागते स्वत:ला
लपवाछपवीचे धंदे मी करतच नाही

बोले तैशी चाले - ऐसी दुनिया नाही
'न-कला' करणे कला कशी ते कळतच नाही

- मंदार.

Friday, March 13, 2009

उधळण

नजरेतुन तुझिया सुटती सखये तीर
रेखीव भुवई जणु हृदयी मम खंजीर
त्या स्मितहास्यावर कापुन दिधले आम्ही
तव तळहाताच्या वेदीवरती शीर


* * *


तो पाउस ’पडतो’ तहानलेल्या भूवर
ते ऊन चकाके ’पडुनी’ दंवबिंदूंवर
ती शांत सावली ’पडते’ वटवृक्षाची
’पडणे’ प्रेमातहि का न गमे सुमनोहर?


प्रेमात "पडणं" (to "fall" in love) हा शब्द न आवडणा-यांना:
त्या पडण्याला नापसंती दाखवणं म्हणजे आकाशीच्या पावसाच्या खाली कोसळत येण्याला "अधोगती" म्हणण्यासारखं आहे. असा पाऊस जेव्हा पडतो, तेव्हा त्यात चिंब भिजून जायचं, का कारणांच्या, शंका-कुशंकांच्या वळचणींमागे लपायचं, हे ज्याचं त्याने ठरवायचं.

माझी ती निवड करून झालेलीच आहे कधीची!

Friday, January 09, 2009

काश ..

काश तुमने किसी ख़त का जवाब ही ना दिया होता
दिल को मेरे एक झूठा हौसला ना दिया होता

दे ही देते इक सज़ा उस जुर्रत-ए-दीदार की
काश नजरों से हमारी कुछ समझ ना लिया होता

मार देते ठोकरें ही, की कदमबोसी जो हमने
भूलकर भी जुर्म ऐसा फ़िर कभी ना किया होता

पी के ग़र ज़िंदा रहे होंगी ही कु़छ ग़ुस्ताख़ियां
काश उस क़ातिल नज़र का जाम ही ना पिया होता

बिन हौसले के मर तो जाते ग़म में तेरे ए सनम
ऐसी उम्मीद-ए-वफ़ा में फ़िज़ूल ही ना जिया होता


- मंदार.